पुणे : केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल ( Pralhad Singh Patels ) हे शुक्रवारी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्या होते. या दरम्यान त्यांनी मुळशी तालुक्यातल्या मालेगाव येथील सेनापती पांडुरंग बापट यांच्या स्मृतिस्थळाला भेट देऊन अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करत मार्गदर्शन केले.यावेळी भाजप नेते हर्षवर्धन पाटील, राम शिंदेंसह भाजप नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.मुळशी नंतर ते पुरंदर आणि बारामती तालुक्याला भेट देणारे आहेत.
भाजपचा झेंडा फडकविण्याचा आवाहन : देशामध्ये महाराष्ट्र राज्यातील 38% ग्रामीण भागातील घरांमध्ये पाणी हे आघाडी सरकारच्या काळात दिले गेले. राज्यातील काही भागांमध्ये त्यावेळी ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून आघाडी सरकारने वंचित ठेवले याला जबाबदार कोण ? असा प्रश्नही पटेल यांनी यावेळी विचारला.पण मोदी सरकारने जलजीवन मिशन सुरुवात करून आज घरोघरी दुर्गम भागात पाणी देण्याचे काम केले. 38 टक्क्यांवरून आज महाराष्ट्रात 71% ग्रामीण भागात जलजीवन मिशनच्या माध्यमातून पाणी दिले आहे. तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना हक्काचे घर मिळावे याकरता पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातूनही हजारो कोटी रुपयांची तरतूद करून त्यांना हक्काचे घर मिळवून दिले. अशा विविध योजना मोदी सरकारने आणल्या याचा प्रचार प्रसार तळागाळात करण्याची गरज आहे. कार्यकर्त्यांनी पक्ष म्हणून काम केले पाहिजे असे मत पटेल यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच 2024 मध्ये कार्यकर्त्यांच्या बळावरच बारामती लोकसभा मतदारसंघात सर्वांनी एकत्र येत भाजपचा झेंडा फडकविण्याचा आवाहन त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले.
जलजीवन मिशनची सुरुवात : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या ग्रामीण भागातील घराघरांमध्ये पिण्याचे पाणी पोहोचविण्याकरता जलजीवन मिशनची सुरुवात करून ग्रामीण भागातील लोकांमध्ये एक आशेचा किरण निर्माण केला आणि या योजने करता मागील वर्षी 7000 कोटींची तरतूद करून देशातील ग्रामीण भागामध्ये घरोघरी पाणी पोचवण्याचे काम केले .असे केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी सांगितले. भारतीय जनता पार्टी कडून बारामती लोकसभा मतदारसंघाची जोरात तयारी सुरू असून त्याकरता विविध केंद्रीय मंत्र्यांचे दौरे सध्या या मतदारसंघात होत आहेत त्याचाच भाग म्हणून केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंह पटेल हे बारामती दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्या संदर्भात आज ते पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.