पुणे - दिल्लीतील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस लुप्त झाली. त्यामुळे भाजप आणि आप(आम आदमी पार्टी)मध्ये सरळ लढत झाली. काँग्रेसने आपली मते 'आप'कडे का वळवली? हे जाणून घेणे गरजचे आहे, असे मत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले. त्यांनी दिल्लीतील पराभवाचे खापर अप्रत्यक्षपणे काँग्रेसवर फोडले.
पुण्यात प्रकाश जावडेकर यांच्या उपस्थितीत पुणे शहरातील केंद्रीय स्तरावरील विविध प्रकल्पांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित केली होती. या नंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भाजपच्या दिल्लीतील पराभवाबाबत अमित शाह यांनी केलेले विश्लेषण महत्त्वाचे आहे. मात्र, काँग्रेसने शस्त्र का टाकली हे पाहणेही गरजेचे आहे, असे जावडेकर म्हणाले.
हेही वाचा - कोरेगाव-भीमा प्रकरणाचा तपास करण्यासाठी राज्य पोलीस सक्षम - अनिल परब
लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला 26 टक्के मते होती. ती आता 4 टक्के झाली आहेत. आप आणि भाजपमध्ये सरळ लढत झाली त्याचा फटका बसल्याचे जावडेकर म्हणाले. केजरीवाल यांना आपण कधीही अतिरेकी म्हणालो नव्हतो, असा घुमजावही जावडेकर यांनी केला.
शहरात सध्या मेट्रोचे काम प्रगती पथावर असून येत्या मार्चपर्यंत पहिल्या टप्प्यातील (पिंपरी ते फुगेवाडी) मेट्रो सुरू होईल. कोरेगाव भीमा प्रकरणाचा तपास एनआयएकडे देण्याबाबत राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये मतभेद आहेत. मात्र, तरीही हा तपास एनआयएकडेच देण्यात येईल, असे जावडेकरांनी सांगितले.