पुणे- देशात कोरोना विषाणूचा विस्तार आणि पुण्यात कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पिंपरी-चिंचवड शहराचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी नागरिकांना घराच्या बाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे. त्याचबरोबर, पिंपरी-चिंचवड शहरात करोना बधित रुग्णांची संख्या ३ वरून ८ वर पोहोचली असून या रुग्णांची विशेष काळजी घेण्यात येत असल्याचे आयुक्त हार्डीकर यांनी सांगितले.
संपूर्ण जगात थैमान घातल्यानंतर कोरोना विषाणूने भारतात देखील आपले पाय पसरविण्यास सुरुवात केली आहे. राज्यात पहिला कोरानाचा रुग्ण हा पुणे जिल्ह्यात आढळला. त्यानंतर, इतर जिल्ह्यातही कोरोना बाधितांची संख्या वाढू लागली आहे. पुण्यातील पिंपरी-चिंचवड शहरात देखील हिच अवस्था आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात कोरोनाचे ३ पॉझेटिव्ह रुग्ण दाखल असून भोसरी रुग्णालयात ५ रुग्ण दाखल आहेत.
त्यातच काल पिंपरी चिंचवड येथील रुग्णालयात दाखल केलेले रुग्ण हे आधी दाखल केलेल्या कोरोना पॉझेटिव्ह रुग्णांचेच नातेवाईक आहेत. त्यांच्यावर देखील योग्य उपचार सुरू आहेत. मात्र, या परिस्थितीत नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.
पिंपरी-चिंचवडकरांनी घरात राहावे. मुलांनी, वडीलधाऱ्या व्यक्तींनी, गर्भवती स्त्रिया आणि जेष्ठ नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन हार्डीकर यांनी केले. सर्दी खोकला आल्यास नागरिकांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोरोनाबाबत आवश्यक ती सर्व काळजी घेतल्यास शहरात कोरोणाचा प्रादुर्भाव होणार नाही, असा विश्वास आयुक्त श्रावण हार्डीकर यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा- पुण्यातील काही भागात जमावबंदीचा विचार; विभागीय आयुक्त म्हैसेकरांची माहिती