पुणे - बीडच्या पूजा चव्हाण या 22 वर्षीय तरुणीचा मृत्यू डोक्याला आणि मणक्याला गंभीर दुखापत झाल्याने झाला असल्याचा उल्लेख शवविच्छेदन अहवालामध्ये केलेला आहे. पुण्यातील वानवडीतील एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून उडी घेत तिने आपले आयुष्य संपवले होते. रविवारी (7 फेब्रुवारी) रात्री ही घटना घडली होती. पुजा मुळची बीडच्या परळीची रहिवासी होती. ती मागील महिन्यातच पुण्यात आली होती.
स्पोकन इंग्लिशाच्या कोर्ससाठी आली होती पुण्यात
पूजा चव्हाण तिचा चुलत भाऊ आणि एका मित्रासोबत पुण्यात राहत होती. तिचे बीएचे शिक्षण पूर्ण झाले होते. पुण्यात ती स्पोकन इंग्लिशाच्या कोर्ससाठी आली होती. यानंतर पुण्यात येऊन दोनच आठवडे होत नाहीत, तोच तिने हे टोकाचे पाऊल उचलले. तिने राहत असलेल्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या कली. तिच्या डोक्याला आणि मणक्याला गंभीर दुखापत झाल्याचेही सांगितले जात आहे.
एका बड्या मंत्र्याचे नाव येत आहे समोर
बीडच्या परळी येथील तरुणी पूजा चव्हाण प्रकरणी राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात महाविकास आघाडी सरकारमधील एका बड्या मंत्र्याचं नाव घेतलं जात असल्यानं या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळालं आहे, मात्र तरीही पोलिसांकडून अद्याप कारवाई केली जात नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जातंय. पोलीसांनी अद्याप कारवाई का केली नाही, याचं कारण आता समोर आलं आहे.
भाजपकडून शिवसेना नेते संजय राठोड यांच्यावर कारवाईची मागणी
पुण्यातील तरुणीच्या आत्महत्या प्रकरणावरून राजकारण चांगलेच तापले आहे. या आत्महत्येमागे महाविकास आघाडीमधील एक मंत्री असल्याचे वारंवार सांगितले जात होते. मात्र, हा मंत्री कोण आहे, याचा उलगडा होत नव्हता. यादरम्यान भाजपने पहिल्यांदाच जाहीरपणे शिवसेना नेते संजय राठोड यांचे नाव घेतले असून कारवाई करण्याची मागणी केली आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.