पुणे - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शिरुर शहरात लॉकडाऊन कडक करण्यात आला आहे. या काळात शहरात व परिसरात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर पोलिसांच्यावतीने कडक कारवाई करण्यात येत आहे. याप्रकरणी आतापर्यंत 340 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी माहिती दिली.
लॉकडाऊनच्या काळात नियम तोडून विनाकारण फिरणार्या 27 दुचाकी चालकांवर कारवाई करून दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. तर, तीन चारचाकी वाहनेही जप्त करण्यात आली आहेत. मुंबई दारूबंदी कायद्यांतर्गत कलम 65 ( इ) प्रमाणे 39 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर, शहरात गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या 24 जणांना लॉकडाऊनच्या काळामध्ये तडीपार केले असल्याचेही खानापुरे यांनी सांगितले.
पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव होत आहे. यामुळे, पोलीस नागरिकांना घरातच राहाण्याचे आवाहन करत आहेत. मात्र, नागरिकांना याचे गांभीर्य राहिले नसल्याने पोलीस यंत्रणा हातबल झाली आहे. त्यामुळे, आता पोलिसांनी कडक कारवाई करुन गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे.