पुणे - पुण्याच्या मध्यवस्तीत असलेल्या खडक पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. या छाप्या दरम्यान तब्बल 35 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच त्यांच्याकडून पावणे दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. सोमवारी रात्रीच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या जुगाराविषयी स्थानिक पोलिसांना माहित नव्हते का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
35 जणांना ताब्यात
यावेळी पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या निलेश रणपिसे, आझाद तांबोळी, छगन उजगरे, संतोष आयणापुरे, महंमद शेख, राजकुमार रोहरा, आनंद चव्हाण, भारत शिलवंत, नंदकुमार परदेशी, राजेश शेळके, सूरज साळुंखे, भरत दगडे, संतोष साखरे, बाळू निली, शाहजी गायकवाड, श्रीधर देवदास, मनिशकुमार ठाकूर, राजेंद्र खुळे, कृष्णा चव्हाण, सूर्यकांत बडगुजर, रोहितकुमार राऊत, नितीन राक्षे, कुमार चव्हाण, महेश पवार, रवींद्र राजपूत, शुभम मिश्रा, सुनील पोळ, अनिल खिलारे, रमेश नाईक, प्रमोद भोसले, राजीव कुसाळ, अमन गायकवाड, चंद्रकांत निरगुडे, मेहबूब मुजावर, मेहताब शेख अशा 35 जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्या ताब्यातून 1 लाख 66 हजार रुपये, मोबाईल व इतर ऐवज जप्त करण्यात आला आहे.
अवैध धंदे चालू देणार नाही
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, परिमंडळ एकच्या पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांना खडक पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर मटका सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांनी समर्थ आणि विश्रामबाग पोलिस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना ज्या ठिकाणी कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलिसांच्या एका पथकाने रात्रीच्या सुमारास या ठिकाणी अचानक छापा टाकला. यावेळी जुगार खेळताना तब्बल 35 जण पोलिसांच्या ताब्यात सापडले. या सर्वांवर खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी स्वतः शहरात अवैध धंदे चालू देणार नसल्याचे म्हटले आहे. मागील काही दिवसात स्वतः आयुक्तांनी लक्ष घालून शहरातील अनेक अवैध धंद्यांवर कारवाई केली आहे. परंतु खडक पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर सुरू असणाऱ्या या जुगार अड्डाविषयी पोलिसांना माहीत नव्हते, की मुद्दाम त्याकडे दुर्लक्ष केले जात होते, असा प्रश्न यानिमित्ताने विचारला जात आहे. खडक पोलीस स्टेशनच्या कार्यक्षमतेवरही यानिमित्ताने प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
हेही वाचा - कोरोना लस घेतल्यानंतर कर्मचाऱ्याचा मृत्यू, आरोग्य मंत्रालयाने दिलं स्पष्टीकरण