पिंपरी- चिंचवड/ पुणे - पुण्यातील ऑर्किड हॉटेलमध्ये लग्नसमारंभात वऱ्हाडी बनून आलेल्या चोरट्यांनी वधूच्या आईकडे असलेले 65 तोळे सोन्याचे दागिने, 9 लाख रुपयांची रोकड लंपास केली होती. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी मध्यप्रदेशातील कडीयासांसी गावातून आरोपीकडू 65 पैकी 53 तोळ्याचे सोन्याचे दागिने परत आणले आहेत.
आरोपींना अटक - 6 डिसेंबर 2022 रोजी पुण्यातील ऑर्किड हॉटेलमध्ये लग्नसमारंभ ही घटना घडली होती. रितीक महेश सिसोदिया, वरुण राजकुमार सिसोदिया, शालू रगडो धपाणी, श्याम लक्ष्मण सिसोदिया हे आरोपी मात्र पसार झाले आहेत. पोलिसांवर तेथील जमावाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी हवेत गोळीबार करून जमाव पांगवला.
पोलिसांचा हवेत गोळीबार - नातेवाईक असल्याचे भासवत अज्ञात दोघांनी हॉटेलमध्ये प्रवेश केला होता. चोरट्यांनी वधूच्या आईवर लक्ष ठेवत 65 तोळे सोन्याचे दागिन्यासह नऊ लाख रुपये घेऊन पोबारा केला होता. या घटनेबाबत तात्काळ हिंजवडी पोलिसांना माहिती देण्यात आली होती. पोलिसांनी सीसीटीव्ही तपासल्यानंतर चोरटे मध्यप्रदेश येथील असल्याचं तपासात पुढे आले होते.
पथक मध्यप्रदेशात 17 दिवस ठाण मांडून - सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर काटे, राम गोमारे यांच्या पथकाला आरोपी हे मध्यप्रदेश येथील कडीयासांसी गावात असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांचे पथक मध्यप्रदेशात 17 दिवस ठाण मांडून होते. अखेर, स्थानिक पोलिसांच्या मदतीने कडीयासांसी गावात आरोपींना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, जमावाने पोलिसांना घेरलं, स्थानिक पोलिसांनी हवेत गोळीबार करून जमाव पांगवला.
53 तोळे सोने परत आणण्यात पोलिसांना यश - आरोपीच्या घरातून 53 तोळे सोन्याचे दागिने परत आणण्यात पोलिसांना यश आले. ही कारवाई पोलिस आयुक्त विणयकुमार चौबे, मनोज लोहिया, अप्पर पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलिस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे, सहायक पोलिस आयुक्त श्रीकांत डिसले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, गुन्हे पोलिस निरीक्षक सुनील दहिफळे, सोन्याबापू देशमुख, तपास पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमुख सागर काटे, राम गोमारे, पोलिस उपनिरीक्षक रमेश पवार, पोलिस अंमलदार बाळकृष्ण शिंदे, बंडू मारणे, कैलास केंगले, विक्रम कुदळ, योगेश शिंदे, कुणाल शिंदे, बापूसाहेब धुमाळ, अरुण नरळे, चंद्रकांत गडदे, रितेश कोळी, श्रीकांत चव्हाण, कारभारी पालवे, सुभाष गुरव, अमर राणे, ओमप्रकाश कांबळे, दत्ता शिंदे, सागर पंडित यांनी केली आहे.