दौंड (पुणे) - कोरोनाच्या पार्श्वभुमीवर ग्रामपंचायत निवडणुका होणार आहेत. सोशल डिस्टींगचे पालन करत निवडणुका पार पाडाव्यात, असे आवाहन यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी केले आहे.
28 गावांमध्ये पॅनेल प्रमुख आणि उमेदवारांच्या बैठकीचे आयोजन
दौंड तालुक्यातील 51 ग्रामपंचायतींपैकी यवत पोलीस स्टेशनच्या अंतर्गत 28 गावांमध्ये 143 मतदार केंद्रात ग्रामपंतायतच्या निवडणुका होत आहेत. त्यातच तालुक्यात पुन्हा कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. त्याच वातावरणात ग्रामपंचायत निवडणुका होत असल्याने प्रशासनाची डोके दुखी वाढली आहे. गावातील गावकी आणि भावकीच्या आणि गटातटाचे राजकीय वातावरण तापु लागले आहे. या पार्श्वभुमीवर यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी यवत पोलीस स्टेशनच्या निवडणुका होत असलेल्या 28 गावांमध्ये पॅनेल प्रमुख आणि उमेदवारांच्या बैठकीचे आयोजन केले आहे.
निवडणुका शांततामय वातावरणात पार पाडा
राजकीय मतभेद व राजकीय द्वेष न करता निवडणुकीला सामोरे जा, मतदारांवर दबाव आणणे, दमदाटी करणे असे प्रकार होऊ देऊ नका, या निवडणुका शांततामय वातावरणात पार पाडाव्यात मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रात तणावग्रस्त वातावरण होणार नाही याची काळजी घ्यावी, निवडणुक आयोगाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.
संवेदनशील केंद्रांवर विशेष लक्ष
निवडणुकीच्या कालवधीत कोणी गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितावर कायदेशीर कारवाई करू, असा इशाराही पाटील यांनी दिला. दरम्यान राजकीय संवेदशील गावांकडे पाटील यांनी विशेष लक्ष घातले आहे. अशा ठिकाणी मतदान केंदात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
पाटस पॅनल प्रमुख आणि उमेदवार उपस्थित :
पाटस येथे यवत पोलिसांनी आयोजित केलेल्या बैठकीला यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, पाटस पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक आर. एन. घाडगे याच्यासह पोलीस कर्मचारी आणि पाटस येथील निवडणूक रिंगणात उतरलेले उमेदवार आणि पॅनल प्रमुख उपस्थित होते.
हेही वाचा - सीरमच्या 'कोविशिल्ड' लसीचे देशभरात वितरण सुरू, विमातळावरून 'ईटीव्ही भारत'चा आढावा