बारामती (पुणे)- राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्याबद्दल ट्विटर अकाउंटवर आक्षेपार्ह मजकूर लिहून शेअर केल्याप्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी वेदश्री @वेदश्री_१९ या ट्विटर वापरकर्त्यावर आणि राजे हर्षवर्धन शास्त्री या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसात तक्रार दाखल करणारे अभिजीत जाधव व त्यांचा मित्र अजित कदम हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहेत. अजित कदम हे सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्षाचे काम जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य करतात. तसेच देश-विदेशातील राजकीय, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक घडामोडीचा पाठपुरावा घेत असतात. कदम हे आज ट्विटरवरील घडामोडी पाहत होते. तेव्हा त्यांना वेदश्री या ट्विटर अकाउंटवरून माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याचे तसेच या मजकुराला राजे हर्षवर्धन शास्त्री या अकाऊंटवरून आक्षेपार्ह प्रतिक्रिया दिल्याचे निदर्शनास आले.
हेही वाचा-ठाकरे सरकारकडून 600 कोटी रुपयांचा एसआरए घोटाळा; किरीट सोमैयांचा आरोप
स्क्रीनशॉर्ट्चा पुरावा सादर करून पोलिसात तक्रार-
कदम यांनी आक्षेपार्ह मजकूराचा स्क्रीन शॉट जाधव यांच्या व्हाट्सअपवर पाठविला. त्यानंतर सदर स्क्रीनशॉर्ट्चा पुरावा सादर करत उपनगराध्यक्ष अभिजित जाधव यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. देशात राजकीय तेढ, शत्रुत्व व द्वेषाची भावना निर्माण करून शरद पवार यांची बदनामी करण्याच्या उद्देशाने ट्विटरवर आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
हेही वाचा-गृहमंत्री अनिल देशमुख मुख्यंमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल
दरम्यान, समाज माध्यमात बदनामीकारक व आक्षेपार्ह पोस्ट केल्यानंतर सायबर गुन्हे विभागाकडून नियमितपणे कारवाया करण्यात येत असतात.