पुणे - जिल्ह्यात आणि पुणे शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रकोप वाढत आहे. खबरदारी म्हणून जिल्ह्यातील पर्यटन स्थळे बंद करण्यात आली आहेत. नागरिकांनी पर्यटन स्थळी जाण्यासाठी घराबाहेर पडू नये, असे वारंवार आवाहन करण्यात येत आहे. परंतु, असे असतानाही बंदीचा आदेश झुगारुन ताम्हीणी घाटात पर्यटनासाठी आलेल्या 90 पर्यटकांवर पोलिसांनी कारवाई केली. तोंडाला मास्क न लावणे, रस्त्यावर गर्दी करणे, विनाकारण फिरणे, सोशल डिस्टन्सचे पालन न करणे या कारणामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवसात मुळशी तालुक्यातील पर्यटन स्थळावर अनेक पर्यटक नियमित भेट देत असतात. परंतु, कोरोनामुळे पुणे जिल्ह्यात पर्यटनासाठी बंदी घालण्यात आली. असे असतानाही बंदीचा आदेश झुगारुन पुणे शहरातून पर्यटनासाठी आलेल्या 90 जणांवर पोलिसांनी कारवाई केली. यातील बहुतांश जण हे मास्क न घालता दुचाकीने निघाले होते. पोलिसांनी या सर्वांवर गुन्हे दाखल केले असून त्यांची वाहनेही जप्त केली आहेत.पुणे ग्रामीण पोलिसांनी मागील महिनाभरात संचार बंदीचे आदेश झुगारुन पर्यटनासाठी गेलेल्या 381 पर्यटकांवर गुन्हे दाखल केले आहेत. यापुढेही ही कारवाई सुरुच राहणार आहे. यासाठी मुळशीतील भुगाव, पौड, माले याठिकाणी नाका-बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी जिल्ह्यातील कोणत्याही पर्यटन स्थळावर जाऊ नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.