पुणे - कोरोनावरील दोन लसींना भारतात मान्यता मिळाल्यानंतर प्रत्यक्ष लसीकरण कधी सुरू होईल, याबाबत संपूर्ण भारतात उत्सुकता होती. परंतु ही उत्सुकता आता संपली असून येत्या 16 जानेवारीपासून भारतात प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात होणार आहे. पुणे येथील सिरम इन्स्टिट्यूटमध्ये कोरोनावरील कोविशिल्ड लसीचे चार ते पाच कोटी डोस तयार आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा सिरम इन्स्टिट्यूटला महत्त्व प्राप्त झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर सिरम इन्स्टिट्यूटबाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पुण्यातूनच देशभरात लसीचे वितरण -
केंद्र सरकारने भारतामध्ये कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसींना आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिलेली आहे. यातील कोविशील्ड या लसीचे उत्पादन पुण्यातील हडपसर परिसरात असणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूटमध्ये केले जात आहे. या संस्थेत सद्यस्थितीत कोविशिल्ड लसीचे पाच कोटी डोस तयार असल्याने पुण्यातूनच देशभरात या लसीचे वितरण होणार आहे. पुणे शहरातून विमानाने चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, कोलकाता आणि बंगळूर यासह इतरही प्रमुख शहरांमध्ये ही लस पोहोचवली जाईल. त्यामुळे सिरम इन्स्टिट्यूटमध्ये पुन्हा एकदा सुरक्षितता वाढवण्यात आली आहे. पुणे पोलिसांच्या माध्यमातून सिरम इन्स्टिट्यूटच्या बाहेर चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. सिरम इन्स्टिट्यूटमध्ये येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची वाहतूक सुरक्षित व्हावी, यासाठी संस्थेच्या प्रवेशद्वारावर 15 पोलीस तैनात करण्यात आले आहेत. या संस्थेच्या आतून बाहेर जाणाऱ्या वाहनांची आणि बाहेरून येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी केली जात आहे.
हेही वाचा - चाईल्ड पॉर्न खरेदी-विक्री प्रकरणी दोघांना अटक; सीबीआयची कारवाई