पुणे - कोंढवा परिसरातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका सोसायटीतील सुरक्षा रक्षकानेच पाच आणि सातवर्षीय चिमुकल्या मुलींसोबत अश्लील चाळे केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कोंढवा परिसरात यापूर्वीही अशा प्रकारच्या घटना घडल्यामुळे पालकांची चिंता वाढली आहे. या मुलींच्या पालकांनी केलेल्या तक्रारीनंतर आरोपी सुरक्षारक्षक विरोधात कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. चंद्रकांत वाटाडे (वय 48) असे या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे.
हेही वाचा - ग्राम सडक योजना: केंद्र सरकारशी करावयाच्या सामजंस्य करारास मान्यता
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढाव्यातील एका मोठ्या सोसायटीत आरोपी हा सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो. गेल्या काही वर्षांपासून तो तेथे आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी त्याने फिर्यादींच्या मुलींसोबत लिफ्टमध्ये अश्लील चाळे करत त्यांचा लैंगिक छळ केला. तो काही दिवसांपासून हा घृणास्पद प्रकार करत असल्याचे समजते. हा प्रकार उजेडात आल्यानंतर त्यांनी तत्काळ पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू केला आहे.
शहरात सोसायटींचे सुरक्षा रक्षक असे प्रकार करत असल्याच्या यापूर्वी देखील घटना घडल्या आहेत. त्यामुळे पालकांची चिंता वाढली आहे. अधिक तपास कोंढवा पोलीस करत आहेत.
हेही वाचा - केळीच्या फुलापासून मधुमेहावर गुणकारी सूप; डॉ. तेजोमयींच्या संशोधनाला पेटंट