पुणे- येथील पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील खंडणी दरोडा विरोधी पथक, गुन्हे शाखा यांनी गंभीर गुन्ह्यातील आरोपीला जेरबंद केले आहे. त्याच्यावर खुनाचा गुन्हा, जबरी चोरी, असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. गेल्या सहा वर्षांपासून त्याचा शोध पोलीस घेत होते. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुधीर अस्पत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
हेही वाचा- पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी कपात; जाणून घ्या आजचे दर
सोन्या उर्फ जालिंदर नारायण नलावडे, (वय २६ रा.माल्कुप, ता.पारनेर, जि.अहमदनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सराईत गुन्हेगार सोन्यावर पिंपरी-चिंचवड शहरात एकून १२ गुन्हे दाखल आहेत. त्याने आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाचा खून केला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या सहा वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला खंडणी दरोडा विरोधी पथक, गुन्हे शाखा यांनी अटक केली. वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुधीर अस्पत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरिक्षक विठ्ठल बढे, पोलीस कर्मचारी किरण काटकर, निशात कोळे, आशिष बोटके. सागर शेडगे हे या आरोपीचा शोध घेत होते. दरम्यान, पोलीस नाईक किरण काटकर तसेच आशिष बोटके यांना आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत खून केलेला आरोपी माल्कुप (ता. पारनेर, जि. अहमदनगर) येथे असल्याची माहिती मिळाली. तो भाळवणी येथे बिगारी काम करत होता. त्यानुसार पोलीस उप निरिक्षक बढे आणि त्यांच्या पथकाने त्या ठिकाणी जाऊन सापळा रचून अटक केली. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.