बारामती (पुणे) - इंदापूर तालुक्यातील भिगवण परिसरात अपघातग्रस्त कारमधून तब्बल तीन लाख दहा हजार 300 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेला होता. भिगवण पोलिसांनी याप्रकरणाचा छडा लावला आहे. कोणताही सबळ पुरावा नसतानाही पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. चोरीला गेलेला माल आरोपी भिगवण बाजार पेठेत विक्री करत होता. त्याच्याकडून दोन लाख 60 हजार 300 रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. हनुमंत अमृतराव कुंभार असे आरोपीचे नाव आहे.
चोरीला गेलेला मुद्देमाल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 19 डिसेंबर रोजी सकाळी सहाच्या सुमारास सोलापुर-पुणे हायवे रोडवर आंध्रप्रदेशमधील महेशकुमार रघुमय्या मुदूशेट्टी यांची हुंदई कंपनीची कार व आयशर टेम्पो यांच्यात अपघात झाला. त्यानंतर मुदूशेट्टी सकाळी सात वाजता अपघातग्रस्त कार घेऊन भिगवण पोलीस स्टेशनला लावण्यासाठी येत होते. मुदूशेट्टी हे व्यवसायिक असल्याने त्यांच्या कारमध्ये एक लाख 20 हजार रूपये किमतीचा ॲप्पल कंपनीचा लॅपटॉप, 90 हजार रूपये किमतीचा डेल कंपनीचा लॅपटॉप,50 हजार रूपये किमतीचा ॲप्पल कंपनीचा आयफोन मोबाईल, 45 हजार रुपये किमतीचा निकॉन कंपनीचा कॅमेरा,ड्रायव्हिंग लायसन्स,आर.सी.कार्ड, आधारकार्ड, एचडीएफसी बैंक,फेडरल बैंक,आय.सी.आय.सी.या बँकेचे एटीएम कार्ड, पाच हजार रुपये किमतीचे दोन लॅपटॉप चार्जर व 300 रुपये किमतीची एक बॅग असा तीन लाख 10 हजार 300 किमतीचा मुद्देमाल होता. अपघातग्रस्त कारमध्ये या वस्तू मुदूशेट्टी यांना न आढळल्याने त्यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली होती.
आरोपीला बाजारपेठेतून घेतले ताब्यात
गुन्ह्याचा तपास करताना पोलीस नाईक समीर करे यांना बातमीदाराकडून एक माहिती मिळाली होती. एक व्यक्ती बाजार पेठेत लॅपटॉप घेऊन तो विक्री करण्याच्या उद्देशाने फिरत आहे. पथकाने सदरील व्यक्तीस भिगवण येथील बाजारपेठेतून ताब्यात घेऊन विचारपूस केली. त्यावेळी त्याने चोरी केल्याची कबुली दिली.
हेही वाचा - पिंपरी-चिंचवडमध्ये नूतन वर्षाच स्वागत वाहन तोडफोडीने; 13 जण ताब्यात