पुणे : सध्या गेल्या काही वर्षांचे पुणे शहर हे खूपच बदलले आहे. पुण्यात कधी काय होईल हे कोणालाच सांगता येत नाही. पुणे हे शहर इतके मोठे झाले आहे, यातून मोठ्यातील मोठी वस्तू देखील चोरीला जाऊ शकते. असाच काहीसा प्रकार पुण्यातील सारसबाग परिसरात घडला आहे. सारसबाग परिसरातून चक्क पीएमपीएल बस चोरीला गेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पुण्यातील स्वारगेट पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पोलीस अधिकचा तपास करत आहेत. पीएमपीच्या स्वारगेट आगारातील सुरक्षा अधिकारी सुरेश सोनवणे यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
बस चोरीला गेलीच कशी : नुकताच जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचा पुण्यात मुक्काम होता. यामुळे पीएमपी बस लावण्यास जागा उपलब्ध नसल्याने पीएमपी बस पूलगेट आगारात न लावता सारसबाग परिसरात लावण्यात आली. त्यावेळी बसला चावी तशीच होती. चावी पाहताच चोरट्याने मध्यरात्रीच बस पळवून नेली. यानंतर चोरट्याने पीएमपी बस मार्केट यार्ड आगाराच्या परिसरात ही बस लावून चोरटा पसार झाला. मात्र यावेळी त्याने बसमधील बॅटरी चोरून नेली. या धक्कादायक घटनेनंतर स्वारगेट पोलीस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीएमपीच्या स्वारगेट आगारातील सुरक्षा अधिकारी सुरेश सोनवणे यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस कर्मचारी सिताप याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
PMPML देणार मोफत पास : काही दिवसापूर्वी विद्यार्थ्यांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करुन दिली होती. पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडने पुणे महानगरपालिकेच्या शाळांमधील इयत्ता 5 वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना मोफत बस पास देण्याचा निर्णय घेतला होता. तसेच 5 वी ते 10 वीच्या खासगी शाळेतील विद्यार्थ्यांना बस भाड्यात 25 टक्के सूट दिली होती.