पुणे - राजगुरुनगरमध्ये वाढत असलेल्या शहरीकरणामुळे दिवसेंदिवस अनेक समस्या वाढत आहेत. त्यामुळे सामान्य नागरिक हतबल होत आहेत.अॅड. जी ए कुलकर्णी यांनी राजगुरुनगर शहरातील समस्यांबाबत थेट पंतप्रधान कार्यालयासोबत पत्र व्यवहार करून तक्रार केली होती. पंतप्रधान कार्यालयाने त्यांच्या पत्राची दखल घेतली असून पंतप्रधान कार्यालयाकडून राज्याच्या मुख्य सचिवांना याबाबत पत्र लिहिण्यात आले आहे. राजगुरुनगरमधील समस्यांचे तत्काळ निवारण करण्याच्या सुचनाही मुख्य सचिवांना मिळाल्या आहेत.
समस्या मार्गी लागण्याची आशा -
राजगुरुनगर शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, सांडपाणी, रस्ते, दिवाबत्ती अशा अनेक समस्या आहेत. या समस्या सोडवण्यासाठी अॅड. जी ए कुलकर्णी यांनी राजगुरुनगर नगरपरिषदेकडे वारंवार पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला. मात्र, नगरपरिषदेने त्यांच्या पत्रासह शहरातील समस्यांकडेही दुर्लक्ष केले. अॅड. कुलकर्णी यांनी राजगुरुनगर शहरातील समस्यांबाबत पंतप्रधान कार्यालयाशी पत्र व्यवहार केला. या तक्रारीची पंतप्रधान कार्यालयातून अतिरिक्त सचिव आशिषकुमार मिश्रा यांनी दखल घेऊन राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिले. राजगुरुनगर शहरातील समस्यांची दखल पंतप्रधान कार्यालयाने घेतल्याने आता शहरातील समस्या लवकर मार्गी लागतील, अशी अशा आहे.
शहरातील समस्या वाढल्या -
राजगुरुनगर येथील नागरिक अॅड. जी ए कुलकर्णी यांनी शहरातील समस्यांबाबत गेल्या चार वर्षापासून राजगुरुनगर नगरपरिषदेमध्ये तक्रारी केल्या. शहरातील पाणी पुरवठा, नदीपात्रातील सांडपाण्यामुळे विकत पाणी प्यावे लागणारे पाणी, शहरातील रस्त्यांवरील खड्डे, फुटपाथविना असलेले अरूंद रस्ते, कचरा व्यवस्थापनाचा अभाव, मोकाट कुत्री आणि डुकरांची समस्या, असे अनेक पश्न शहरातील नागरिकांसमोर आहेत. या समस्या सोडवण्यासाठी अॅड कुलकर्णी यांनी राजगुरुनगर नगरपरिषदेला कायदेशीर नोटीस दिली होती. त्याची एक प्रत पंतप्रधान कार्यालयाला पाठवण्यात आली.
झपाट्याने वाढत आहे शहराचा पसारा -
राजगुरुनगर पुणे जिल्ह्यातील महत्त्वाचे ठिकाण आहे. त्यामुळे या शहराचा झपाट्याने पसारा वाढत आहे. बाहेरून मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी स्थलांतरित होत आहेत. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येसोबत नागरि समस्यांमध्येही वाढ होत आहे. या समस्यांचे निराकरण करण्याचे काम नगरपरिषदेचे आहे. मात्र, नगरपरिषद याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसते.