पुणे - आंबेगाव तालुक्यातील वडगावपीर गावात 'पिरसाहेब हजरत दावल मलिक पीर दर्गा शरिफ' यात्रेनिमित्त राज्यातून अनेक भाविक दर्शनाला येत आहेत. महत्त्वाचे म्हणजे पिरसाहेब यांच्या दर्शनाल सर्व जाती-धर्माचे लोक मोठ्या भक्तीने येत असतात. त्यामुळे या सोहळ्यामध्ये हिंदू-मुस्लीम बांधवाची ऐक्य पाहायला मिळते.
पिरसाहेब यांची यात्रा २ दिवस असते. हिंदू-मुस्लीम या दोन्ही धर्माच्या नागरिकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या पिरसाहेबांच्या यात्रेची सुरुवात पारंपरिक पध्दतीने वाद्याच्या गजरात 'संदल'ची मिरवणूक काढून केली जाते. त्यानंतर फुलांची चादर तसेच मलिदा व गोडभाताच्या नैवद्य दिला जातो. या यात्रेत सर्व जातीधर्माचे नागरिक सहभागी होत असतात.
पिरसाहेबांचा हा यात्रा उत्सव नवसाचा उत्सव मानला जातो. त्यामुळे आपला नवस बोलण्यासाठी राज्यभरातून भाविक येत असतात. वडगावपीर गावात होणाऱ्या पिरसाहेब यात्रेतील मुख्य आकर्षण म्हणजे कुस्तीची 'दंगल' आहे. २ दिवस या परिसरात कुस्तीच्या स्पर्धा सुरु राहणार असल्याचे ग्रामस्थानी सांगितले.