पुणे : पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने पुन्हा शहर रेडझोनमध्ये जाणार असल्याचे स्पष्ट आहे. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हजार किंवा त्या पेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळत असल्याने स्थानिक प्रशासनाने रेडझोनचा प्रस्ताव राज्य शासनाला पाठवला आहे. अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली आहे. दरम्यान, निर्बंध मात्र जैसे थे असतील असे ते म्हणाले आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाबधित रुग्णांची एकूण संख्या 27 हजार पार झाली असून आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, 22 मे रोजी पिंपरी-चिंचवड शहराला रेड झोनमधून वगळण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र, जून आणि जुलै महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जास्त वाढल्याने स्थानिक प्रशासनाने पुन्हा शहरात रेडझोन लागू करण्याबाबत प्रस्ताव राज्य शासनाला दिला गेला आहे. मात्र, यावर सोमवारपर्यंत शिक्कामोर्तब होणार असून सध्या शहरात जे निर्बंध लागू असतील तेच रेडझोनमध्ये असल्याची शक्यता आयुक्तांनी वर्तवली आहे. नागरिकांनी गरज असेल तरच बाहेर पडावे, असं आवाहन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत.
महानगरपालिका आयुक्त काय म्हणाले -
"रेड झोनमधून बाहेर पडल्यानंतर आपल्या शहरातील काही नियम शिथिल झाले होते. जुलै महिन्यात कोरोनाबाधितांची संख्यात्मक वाढ झालेली आहे. हे पाहता इतर शहरांप्रमाणे काही निर्बंध ठेवावे लागणारच होते. त्यामुळे रेडझोनचा प्रस्ताव पाठवला आहे. आत्ता जे अनलॉकमधील ऑर्डर काढलेले आहेत ते रेड झोनअसल्याप्रमाणे काढले आहेत. त्यामुळे फार फरक पडणार नाही. ही ऑर्डर सोमवारपर्यंत येण्याची शक्यता आहे."