पिंपरी-चिंचवड Pimpri Chinchwad Crime : उद्योगनगरी अशी ओळख असणाऱ्या पिंपरी चिंचवड शहरात गुन्हेगारी वाढत चालली आहे. दिवसेंदिवस हत्या, अपहरण, लुटपाटीच्या घटना वाढत आहे. दरम्यान, असं असतानाच आता रस्त्यात का थांबले या कारणावरून काही तरुणांमध्ये बाचाबाची झाली. कानशिलात लगावल्याच्या किरकोळ कारणावरून एका तरुणाची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. ही घटना रात्री दहा वाजेच्या सुमारास तळेगाव दाभाडे परिसरात घडली. या प्रकरणी चार अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
कशी घडली घटना : वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास कृष्णा शेळके (रा. तळेगाव दाभाडे) हा त्याच्या दोन मित्रांसोबत तळेगाव दाभाडे मधील निलया सोसायटी समोर गप्पा मारत थांबला होता. त्यावेळी तिथे आलेल्या अनोळखी चार जणांनी कृष्णा याला इथे का थांबलास असं विचारलं. त्यावरून त्यांच्यात शाब्दिक वाद सुरू झाला. थोड्याच वेळात या शाब्दिक वादाचं रुपांतर मारहाणीत झालं. या मारहाणीत एका आरोपीनं खिशातून चाकू काढतं कृष्णाच्या छातीत वार केले. यामध्ये कृष्णा शेळके गंभीर जखमी झाला अन् काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. तसंच घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
- आरोपींचा शोध सुरू : घटनेची माहिती मिळताच तळेगाव दाभाडे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपींचा शोध घेण्याकरीता पोलिसांचं एक पथक मार्गी लागलेलं आहे. लवकरच आरोपी निष्पन्न करून त्यांना अटक केली जाईल, असं आश्वासन पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांनी दिलंय. या घटनेचा अधिक तपास तळेगाव दाभाडे पोलीस करत आहेत.
हत्येमागचे कारण अद्याप अस्पष्ट : कृष्णा शेळके याची हत्या जुन्या भांडणातून किंवा राजकीय वादातून घडली का? याची चौकशी केली जात आहे. तसंच आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार कृष्णा शेळकेचा कोणत्याही राजकीय अथवा गुन्हेगारी क्षेत्राशी संबंध नाहीये. मात्र, नुकतेच मावळ तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकासाठीचे मतदान पार पडले. यातून काही वाद निर्माण झाला असेल अन् त्यामुळं तर ही हत्या केली असावा, अशी शक्यतादेखील व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा -