पुणे - पिंपरी-चिंचवड शहरातील विविध पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एकूण 29 गुन्ह्यातील 47 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी मूळ मालकांना परत केला. पोलीस आयुक्त यांच्या हस्ते हा मुद्देमाल परत करण्यात आला. यावेळी 29 तक्रारदार आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
नागरिकांच्या चेहऱ्यावर आलेले समाधान आम्हाला काम करण्यास प्रेरणा देते. गुन्हे कमी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करायला हवा. संशयित ठिकाणी जास्तीत जास्त सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत. त्यासाठी पोलिसांनी विविध संस्थांच्या मदतीने यासाठी पुढाकार घ्यावा. कोट्यवधीच्या संपत्तीसाठी एखादा सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याची तसदी देखील काही लोक घेत नाहीत. ही खेदाची बाब आहे, असे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई म्हणाले.
तंत्रज्ञानाचा उपयोग करून सुरक्षा अबाधित करणे गरजेचे आहे. स्वतःच्या सुरक्षेसाठी तंत्रज्ञान खरेदी करण्यासाठी नागरिकांनी गुंतवणूक करावी. डिटेक्शनवर पोलिसांनी जोर द्यावा. गुन्हे वाढल्याचे वारंवार ऐकायला मिळते. मात्र, त्याबाबत खबरदारी किती नागरिक घेतात, हे ऐकायला मिळत नाही. गुन्हे दाखल होत असल्याने गुन्हेगारी वाढल्याचे दिसते. मात्र, योग्य तपासणी झाल्यास यावर अंमल आणता येईल. सर्व अधिकाऱ्यांनी यावर काम करावे. दर ३ महिन्यांनी जप्त केलेला मुद्देमाल परत करण्याचा कार्यक्रम होईल. तसेच गुन्हे उघडकीस आणणाऱ्या तपासी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना १ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे, असेही बिष्णोई यांनी सांगितले.