पुणे - पोलीस मित्र म्हणून काम करणाऱ्या जयेश कासट याला खंडणीच्या गुन्ह्यात रविवारी अटक करण्यात आली. डॉक्टर हेमंत अडसूळ यांना धमकावून ५ लाख लुबाडल्याप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
हेही वाचा - 'केंद्राला कोरेगाव-भीमा प्रकरणात काहीतरी झाकायचंय... म्हणूनच तपास 'एनआयए'कडे'
पुण्यातील एका नामांकित डॉक्टर पितापुत्र यांच्यावर विनयभंग आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी मनोज अडसूळ याने दिली होती. अडसूळ याने १ कोटी ३० लाख रुपयांची खंडणीदेखील रासने यांच्याकडे मागितली होती. त्यापैकी ७५ लाख रासने यांनी अडसूळ याला दिले होते.
डॉक्टरकडून घेतलेले पैसे अडसूळ याने आपल्या मार्फत परत द्यावेत, यासाठी जयेश कासटने मनोज अडसूळ याचा भाऊ डॉक्टर हेमंत अडसूळ यांना धमकावण्यास सुरुवात केली. त्यानंतर डॉक्टर हेमंत अडसूळ यांनी जयेश कासटला पाच लाख रुपये दिले. परंतु, त्याने ते डॉक्टर दीपक रासने यांना परत न करता स्वत:कडेच ठेवले. याप्रकरणी कासट याच्याविरुध्द डॉक्टर हेमंत अडसूळ यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर शनिवारी रात्री उशिरा आरोपीला अटक करण्यात आली.
हेही वाचा - 'शिवसेनेने पाठीत सुरा भोकसला, पुन्हा एकत्र येणार नाही'
जयेश कासट हा पुणे पोलिसांसाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करायचा. पोलीस अधिकाऱ्यांसोबत आणि पत्रकारांसोबत असलेल्या ओळखीचा उपयोग त्याने धमकावण्यासाठी केल्याचे डॉक्टर हेमंत अडसूळ यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे जयेश कासट याला मदत करण्यात पुण्यातील काही पत्रकारदेखील सहभागी होते का याची चर्चा सध्या रंगली आहे. दरम्यान, मनोज अडसूळ याच्यावर आधीच खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या तो बेपत्ता आहे.