पुणे - कोरोनाचा रुग्णदर व मृत्यूदर कमी करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे. कोरोना नियंत्रणासाठी लोकप्रतिनिधींनी शासन आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून भूमिका बजावावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
पुण्यातील विधानभवन सभागृहात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे जिल्ह्यातील कोविड व्यवस्थापन व नियोजनाबाबत बैठक घेण्यात आली. बैठकीत जिल्यातील मंत्री व लोकप्रतिनिधींकडून सूचना जाणून घेतल्या.
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, कोविड 19 चा संसर्ग जिल्ह्यात किती दिवसात वाढत आहे, हे पाहून त्यादृष्टीने जिल्ह्यात उपाययोजना कराव्यात. शासकीय यंत्रणा प्रभावी होणे आवश्यक असून आरोग्य सुविधा सक्षम करावी. कोरोना रुग्णांसाठी अद्याप ठोस औषध अथवा लस उपलब्ध नसल्याचे सांगतानाच अशा परिस्थितीत प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि सर्वसामान्य यांच्यात समन्वय असणे आवश्यक आहे. वाढता रुग्णदर व मृत्यूदर कमी करणे हे आव्हान असून यासाठी लोकप्रतिनिधींच्या सहकार्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या हिताचे निर्णय घेताना सर्वांनी शासनाच्या पाठीशी उभे रहावे असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.
राज्यात व्हेंटिलेटर, पीपीई किट, एन 95 मास्क पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून गरजेनुसार त्या-त्या भागात पुरवठा करण्यात येत आहे. महापालिकांना कोरोना प्रतिबंधाच्या अनुषंगाने आर्थिक मदत देण्यात आली असून, यापुढेही मदत देण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. राज्यात प्रत्येक जिल्ह्यात टास्क फोर्स बनविण्याच्या सूचना दिल्या असून, त्यानुसार टास्क फोर्स निर्माण होत आहेत. यामुळे कोरोना उपाययोजनामध्ये सुसुत्रता येईल असेही ते म्हणाले.
व्हेंटिलेटर, पीपीई किट, एन 95 मास्कचा पुरवठा 1 सप्टेंबरनंतरही केंद्राकडून करण्यात यावा, अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदींना केली असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, सर्व लोकप्रतिनिधींनी देखील आपापल्या स्तरावर याबाबत विनंती करावी. जेणेकरुन राज्याला याचा लाभ होईल. कोरोना रुग्ण संख्येच्या परिस्थितीनुसार लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात येत आहेत. तथापि, प्रतिबंधित क्षेत्रात नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे.
तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आलेले रुग्ण बऱ्याचदा रुग्णालयात जायला टाळाटाळ करतात. त्यामुळे वेळेत उपचार न मिळाल्यामुळे रुग्णांचा मृत्यू झाल्याचे आढळून येत आहे. असे होवू नये यासाठी खासगी प्रयोगशाळांनी कोरोना अहवाल पॉझिटिव्ह असणाऱ्या रुग्णांना परस्पर तपासणी अहवाल न देता संबंधित महापालिका यंत्रणेला द्यावा, जेणेकरुन रुग्णांना वेळेत बेड उपलब्ध होईल. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड शहर व पुणे जिल्ह्याचा ग्रामीण भाग यामध्ये एकसुत्रीपणा आणून सर्वांनी मिळून काम करावे, असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.
पुण्यात उभारण्यात येणाऱ्या जम्बो रुग्णालयाचे काम गतीने करावे. संगणकीय प्रणालीमध्ये बेड व्यवस्थापन व अन्य आवश्यक माहिती अद्ययावत ठेवावी. तसेच याचा आढावा वेळोवेळी वरिष्ठ प्रशासकीय यंत्रणेने घ्यावा. झोपडपट्टी परिसरात छोटी घरे असल्यामुळे याठिकाणी गृह अलगीकरणापेक्षा संस्थात्मक अलगीकरणांवर भर द्यावा. ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्यामुळे रुग्णांचा मृत्यू होवू नये यासाठी ऑक्सिजनयुक्त रुग्णवाहिका तयार ठेवाव्यात.
उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी कोरोना परिस्थिती नियंत्रणासाठी दर आठवड्याला पुण्यात प्रशासकीय यंत्रणेसोबत बैठका घेवून आढावा घेत असल्याचे सांगितले. त्याचबरोबर आतापर्यंत पुण्यात राबविण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
यावेळी खाजगी रुग्णायालयांच्या शुल्क आकारणीवर नियंत्रण ठेवावे, कोरोनाच्या रुग्णांना अतिदक्षता विभागातील खाटा, व्हेटिंलेटरची कमतरता भासू नये यासाठी प्रयत्न करावेत. राज्य शासनाने महापालिकेला अर्थसहाय्य करावे. ससून रुग्णालयात तपासणी क्षमता वाढवावी अशा सूचना महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केल्या. महापौर उषा ढोरे यांनी पिंपरीतील शासकीय रुग्णालयामध्ये चांगल्या सुविधा मिळत असल्याच्या प्रतिक्रिया रुग्णांकडून आल्याचे सांगितले.