पुणे - कोरोना काळात लोकप्रतिनिधींचे आपल्याच तालुक्यातील जनतेकडे कसे दुर्लक्ष होत आहे, याचा एक उत्तम नमुना जुन्नरमध्ये उघड झाला आहे. जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांच्या सोशल मीडिया प्रमुखालाच कोरोना यादीमध्ये चक्क मृत दाखवण्यात आले आहे.
कोरोना काळात आधी आमदार खासदार यांनी तालुक्यातील जनतेला कसे वाऱ्यावर सोडले आहे, याची चर्चा होत होती. आता तर त्यांच्याच कार्यकर्त्याला मृत दाखवल्याने आमदार अतुल बेनके आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे अधिकचे टीकेचे धनी होणार हे मात्र नक्की. या गोष्टीचं श्रेय नेहमीप्रमाणे माजी आमदार शरद सोनवणे यांचा कार्यकर्त्यानी घेतले असून पुराव्यासह एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. त्यामुळे प्रशासनावर या निष्काळजीपणामुळे जनतेतून टीका होत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की आळेफाटा येथील विजय भिका कुऱ्हाडे हे विद्यमान आमदार अतुल बेनके यांचे सोशल मीडिया प्रमुख आहेत. त्यांना नुकताच कोरोना झाला होता. विजय बबन कुऱ्हाडे यांचे कोरोनामुळे निधन झाले. मात्र, प्रशासनाने विजय भिका कुऱ्हाडे यांनाच मृत घोषित केले आहे. विजय भिका कुऱ्हाडे यांना मृत दाखवले तसेच त्यांच्या नावापुढे त्यांचा मोबाईल नंबरसुद्धा टाकला. त्यामुळे विरोधकांनी नेहमी प्रमाणे भांडवल करत सोशल मीडियात "का ओ शेठ?" असा व्हिडिओ फॉरवर्ड करत भांडवल केले आहे.