पुणे - संपूर्ण पुणे शहर सील करुनही पुणेकरांवर काडीचा फरक पडताना दिसत नाही आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 20 एप्रिलपासून संपूर्ण शहर सील केलेले असताना अजूनही नागरिक गांभीर्य न बाळगता पुण्यातल्या वानवडी भागात मॉर्निग वॉक, भाजी आणण्यासाठी बाहेर पडल्याचे चित्र होते. तर, कोंढवा भागात वाहने घेऊन पुणेकर रस्त्यावर आल्याने पुणे शहर सील करण्याच्या प्रशासनाच्या आदेशाचा फज्जा उडाल्याचे सकाळीच दिसून आले.
राज्यात कोरोनाचा उद्रेक सुरू आहे. यामध्ये, पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहता, दोन्ही महापालिका प्रशासनाने ही शहरं सील करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे, रविवारी मध्यरात्रीपासून संपूर्ण पुणे शहर बंद करण्यात आले असून पुढील सात दिवस पुण्यात कडक कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. मात्र, असे असतानाही वानवडीमध्ये सकाळीच नागरिक रस्त्यावर आल्याने पोलिसांनी 50 नागरिकांना कवायती करण्याची शिक्षा दिली. वानवडी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या हांडेवाडी रस्त्यावर रेल्वे फाटक ते सातवनगर पर्यंत मॉर्निंग वॉक, भाजीपाला, किराणा सामान, कुत्रे फिरायला घेऊन येणाऱ्या सुमारे ५० नागरिकांवर पोलिसांनी करवाई केली. श्रीराम चौकामध्ये या मुजोर पुणेकरांकडून सुमारे १ तास कवायत व व्यायाम करून घेतला. तसेच. कोरोना विषाणू प्रसाराबाबत त्यांना मार्गदर्शन करून नोटीस देऊन सोडून देण्यात आले. व परत सापडल्यास कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात येईल, असेही सांगण्यात आले.
एकीकडे प्रशासन कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जंगजंग पछाडत असताना नागरिक मात्र अजूनही कोरोनाचे संकट गांभीर्याने घ्यायला तयार नसल्याचे चित्र या प्रकरातून दिसून येत आहे.