पुणे - शहरात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतो आहे. खास करून पुणे शहराच्या मध्य भागात कोरोना संसर्ग झपाट्याने होत असल्याने या भागावर प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे. पुण्यातील कोरोना हॉटस्पॉट असलेल्या 5 वार्डातील झोपडपट्टी भागातल्या नागरिकांना महापालिका शाळांमध्ये स्थलांतरित करण्यात येत आहे.
भवानी पेठ, कसबा पेठ तसेच शिवाजीनगर क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या भागात शहरातील सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. हे भाग अधिक संक्रमित आहे. या भागातील 150 महापालिका शाळांमध्ये नागरिकांचे स्थलांतर करण्यासाठी तयारी करण्यात आली आहे. 150 शाळांमध्ये पाच वार्डातील नागरिकांना स्थानिक नगरसेवकाकडून समजावून स्थलांतरित केले जात आहे. त्याठिकाणी त्यांच्या राहण्याची तसेच पाण्याची व्यवस्था करून दिली असल्याची माहिती पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.
नागरिकांची संख्या वाढल्यास भविष्यात जेवणाची देखील सोय करून दिली जाईल असे त्यांनी सांगितले. कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग असलेल्या या भागात अत्यंत दाटीवाटीने असलेली लोकसंख्या, झोपडपट्टी याचा विचार केला तर कोरोनाचा संसर्ग आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे इथल्या नागरिकांना महापालिकेच्या शाळांमध्ये स्थलांतरित केले जात असल्याचे आयुक्तांनी सांगितले.