पुणे : पिंपरी-चिंचवड शहराला रेडझोनमधून वगळण्यात आले आहे. आज शुक्रवारपासून शहरातील दुकाने खुली करण्यात आली आहेत. परंतु, दोन महिन्यांनंतर दुकाने उघडण्यात आल्याने अनेक ठिकाणी ग्राहकांची गर्दी पाहायला मिळाली. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला असून रस्त्यांवरही नागरिकांनी गर्दी केली. यामुळे कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढू शकतो.
आज शुक्रवारपासून सम-विषम तारखेनुसार शहरातील सर्व दुकाने उघडण्यात आली आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी हे मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूचे मार्केट आहे. दोन महिन्यांनंतर दुकाने उघडल्याने त्याठिकाणी ग्राहकांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, पिंपरी मार्केटमधील एकाच बाजूची दुकाने उघडण्यात आली होती. शहरात दुचाकीवर एकाच व्यक्तीला मुभा असताना दोन व्यक्ती सर्रासपणे प्रवास करताना दिसत आहेत. त्यामुळे महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या आदेशाला अनेकांनी केराची टोपली दाखवली आहे.
कोरोनापासून बचाव करण्यासाठी दुकांनामध्ये सॅनिटायझर आणि मास्क बंधनकारक असून काही दुकानदारांनी मास्क लावल्याचे निदर्शनास आले नाही. गेल्या दोन महिन्यांपासून पिंपरी मार्केट बंद होते. त्यामुळे आणखी गर्दी वाढण्याची शक्यता असून कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव होऊ शकतो. दुकानदारांनी महानगरपालिकेच्या नियमांचे पालन न केल्यास दुकानदारांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.