पुणे - कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने सोशल डिस्टंस पाळण्याचे आवाहन केले आहे. मात्र, सध्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने पुण्यातील उरळी देवाची या गावात पाण्याच्या टँकरभोवती नागरिकांनी तुफान गर्दी केली. त्यामुळे सोशल डिस्टंसचा फज्जा उडाला आहे.
काही दिवसांपूर्वी पुणे महापालिकेत जी नव्याने अकरा गावे समाविष्ट झाली त्यात उरुळी देवाची या गावाचा समावेश आहे. परंतु, अद्यापही या गावात मूलभूत सुविधांची वानवा असल्याचे दिसून येत आहे. उन्हाळा आला की येथील ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. या गावात काही वर्षापूर्वी बंदिस्त पाईपलाईनचे काम पूर्णही झाले होते. मात्र, यातून पाणीपुरवठा अद्याप झालेला नाही. परिणामी गावकऱ्यांना पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे गावात पाण्याचा टँकर आला की त्याभोवती गावकऱ्यांची एकच गर्दी होते. सध्याच्या कोरोना विषाणूच्या दृष्टीने ही गर्दी घातक ठरू शकते. ग्रामस्थांना यावेळी सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणे यासारख्या उपाययोजनाचा विसर पडतो.