पिंपरी-चिंचवड (पुणे) - पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी लस घेतली नसेल तर घेणे आवश्यक आहे. अन्यथा जुलै महिन्याचा पगार स्थगित होण्याची शक्यता असल्याची ताकीदच महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील यांनी पत्रकाकाद्वारे दिली आहे. महानगरपालिकेत एकूण 7 हजार 479 इतके अधिकारी आणि कर्मचारी काम करतात. परंतु वारंवार सांगूनही अनेकांनी लसीकरण करून घेतले नाही. त्यामुळे पगार स्थगित करण्याची वेळ येऊ देऊ नका, असा इशाराच आयुक्तांनी दिला आहे.
'...तर पगार स्थगित होणार'
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आस्थापनेवर गट अ ते ड संवर्गात 7 हजार 479 अधिकारी, कर्मचारी काम करत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव व प्रसार रोखण्यासाठी महापालिका स्तरावर विविध उपाययोजना युद्ध पातळीवर करण्यात येत आहेत. महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांचे आरोग्य निरोगी रहावे व कोरोनापासून संरक्षण मिळावे, याकरिता महापालिका कार्यक्षेत्रातील विविध ठिकाणी लसीकरण केंद्रे उभारण्यात आले आहेत. अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण करुन घेण्याबाबत तीनवेळा कळविण्यात आले आहे. मात्र अद्यापपर्यंत बहुतांशी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लस घेतली नसल्याचे निदर्शनास आले आहे. शाखाप्रमुख, विभागप्रमुख यांनी आपल्या नियंत्रणाखालील सर्व अधिकारी, कर्मचारी, सेवानिवृत्त झालेले कर्मचारी मानधनावरील, ठेकेदारी पद्धतीच्या बहुतांश कंत्राटी कर्मचाऱ्यांनी जर अद्यापपर्यंत कोरोना प्रतिबंधक लस घेतली नसेल, तर त्यांनी 20 जुलैपर्यंत लसीचे दोन्ही डोस घ्यावेत. अन्यथा जुलै महिन्याचा पगार स्थगित करण्याबाबत विचार करण्यात येईल, असा इशारा आयुक्त राजेश पाटील यांनी दिला आहे. सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी यांच्याबाबतीत लेखा विभागाकडून संबंधितास कळविण्यात यावे, असे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.
हेही वाचा -नाशिकमध्ये आयुर्वेद उपचाराचा प्रयोग यशस्वी; सुरगाणा तालुका कोरोनामुक्त