पुणे - कोथरूड येथील माइर्स एमआयटी विश्वशांती गुरुकुल शाळेमध्ये SSC बोर्ड चालू होते. मात्र, 2 वर्षांपूर्वी शाळेने CBSE बोर्ड चालू करण्याचा घाट घातला आहे. त्याप्रमाणे पालकांवर दडपशाही करून मुलांना CBSE बोर्डमध्ये प्रवेश घ्या अथवा दाखला घेऊन शाळा सोडा, असा मार्ग अवलंबला जात असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. या दडपशाहीविरोधात आमरण उपोषण करण्याचा इशारा पालक कृती समितीने दिला आहे.
याविरोधात शासन स्तरावर जाऊन पालक कृती समितीने सर्व ठिकाणी तक्रारी दिल्या. मात्र, न्याय मिळाला नाही, असे संघटनेचे म्हणणे आहे. या शाळेत SSC बोर्ड अंतर्गत दुसरी ते नववीपर्यंतच्या वर्गात अंदाजे 1200 विद्यार्थी शिकत आहेत. त्यांना SSC बोर्डामधून दहावी पासआउट करून द्यावे त्यानंतर CBSE बोर्ड चालू करावे, अशी मागणी MIT VGS पालक कृती समितीच्यावतीने केली जात आहे.
शाळेने समितीची मागणी मान्य न केल्यास त्यांच्या दडपशाहीमुळे 1200 विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतील. त्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी खेळ होईल, यावर शाळेने मार्ग काढून SSC बोर्ड चालू ठेवावे. या मागण्या मान्य नाही झाल्या तर पालक कृती समितीच्यावतीने पुण्यातील वेगवेगळ्या शिक्षण कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा समितीने दिला आहे.