पुणे - पुणे-सासवड रस्त्यावरील दिवेघाट हा कोरोना संसर्गानंतर सुनासुना झाला आहे. मात्र, यंदाचा पालखी वारी सोहळा नसल्याने मंगळवारी या घाटातील शांतता अधिकच गडद भासत आहे. यंदाच्या पालखी वारी सोहळ्याच्या वेळापत्रकानुसार आळंदीहुन निघणारी संत ज्ञानेश्वरांची पालखी आज दिवाघाटाचा हा खडतर प्रवास करणार होती. मात्र, कोरोना संकटामुळे दरवर्षी दिवेघाटातून जाणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे अनुपम रूप, वारकऱ्यांचा अमाप उत्साह, टाळ मृदुंगाचा आवाज असे हे भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळणार नाही.
दरवर्षीच्या शिरस्त्याप्रमाणे दोन्ही पालख्या पुण्यातून मार्गस्थ होत असतात. मात्र, यावर्षी पायी पालखी सोहळा रद्द आहे. तर, ज्ञानोबा, तुकोबांच्या पादुका थेट वाहनाने पंढरपुरला पोहोचणार आहेत. आज ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा प्रवास दिवे घाटातून होत असतो. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज हा दिवे घाट सुना पडला आहे. माऊलींची पालखी दिवे घाट चढून सासवड मुक्कामी पोहोचते. हा अनुभव खूप वेगळा आणि आनंददायी असतो. यावेळी दिवेघाटातील दृश्य विहंगम असते, त्याला महाराष्ट्र यंदा मुकला आहे.
संत तुकाराम महाराज यांची पालखी मुख्य मंदिरातून प्रस्थान केल्यानंतर देहूमध्येच इनामदार वाडा येथे आषाढी एकादशीच्या आदल्या दिवसापर्यंत राहणार आहे. तर, संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी देखील प्रस्थानानंतर आळंदीतल्या गांधीवाडा येथे मुक्कामी आहे. त्यामुळे दिवेघाटातील या अनुपम सोहळ्याची परंपरा यंदा खंडित झाली आहे.