पुणे - पुलवामा येथे तब्बल ३५० किलो स्फोटकांनी भरलेल्या ट्रकद्वारे जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याने गुरुवारी सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला. या भीषण आत्मघातकी हल्ल्यात ३९ जवान शहीद झाले. या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेने पाकिस्तानचा झेंडा जाळून निषेध केला आहे.
पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश क्रोधीत झाला असून पिंपरी चिंचवडमध्ये चिमुरड्यांकडूनदेखील या घटनेचा निषेध करण्यात आला आहे. निषेध म्हणून पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात पाकिस्तानचा झेंडा जाळण्यात आला आणि शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार गौतम चाबुकस्वार, जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, शहरप्रमुख योगेश बाबर, महिला संघटक उर्मिला काळभोर, नगरसेवक सचिन भोसले, माजी नगरसेवक मधुकर बाबर, रोमी संधू, युवराज कोकाटे उपस्थित होते.
भोसरी विधानसभेच्या वतीने मोशीतील शिवाजी चौकात शिवसेना शिरूर जिल्हा महिला संघटिका सुलभा उबाळे, भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचा झेंडा जाळून हल्ल्याचा निषेध करत हुतात्मा जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ यासह पाकिस्तानच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.