पुणे : पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या दहा दिवसांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात आली होती. यादरम्यान संचारबंदी लागू करण्यात आली होती, तसेच नागरिकांना बाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला होता. मात्र, अवघ्या दहा दिवसांमध्ये तब्बल 6 हजार 97 जणांनी नियमांची पायमल्ली केली असून त्यांच्यावर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी 188 नुसार गुन्हे दाखल केले आहेत. याबाबत सहाय्यक पोलीस आयुक्त आर.आर पाटील यांनी माहिती दिली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 13 जुलैच्या मध्यरात्री पासून दहा दिवसांचे लॉकडाऊन लागू करण्यात आले होते. त्याची मुदत काल गुरुवारी संपली आहे. यादरम्यान नियमांची पायमल्ली करणाऱ्या 6 हजार 97 नागरिकांनी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी गुन्हे दाखल करत 188 नुसार कारवाई करण्यात आली आहे. विनामास्क, संचारबंदीचे उल्लंघन, डबल आणि ट्रिपल सीट दुचाकीवर जाणे, नियमबाह्य आस्थापने खुली ठेवणे अशा प्रकारच्या व्यक्तींवर ही कारवाई करण्यात आली आहे.
शहरातील 69 नाकाबंदीच्या ठिकाणी पोलिसांचा फौजफाटा तैनात होता. संचार बंदी लागू असल्याने शहरात बहुतांश परिसर, चौक हे निर्मनुष्य दिसत होते. अगदी मुख्य रस्ते देखील सामसूम असल्याचे पहायला मिळाले. तर, आज (शुक्रवार) रात्री 9 ते पहाटे 5 वाजे पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली असून नागरिकांनी यावेळेत बाहेर पडू नये असे आवाहन सहाय्यक पोलीस आयुक्त आर.आर. पाटील यांनी केले आहे. तसेच, नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असेही सांगितले आहे.