पुणे - शहरात आता अनलॉकच्या दिशेने पुढचे पाऊल टाकण्यात आले असून शहरात आता खेळांना अटी व शर्तीसह परवानगी देण्यात आली आहे. पुणे महापालिका आयुक्तांनी या संदर्भातले आदेश जारी करत खेळांना परवानगी दिली आहे. क्रिकेट, खो-खो, फुटबॉल इत्यादी मैदानी खेळांसह, ज्या खेळांमध्ये सुरक्षित अंतर राखून खेळता येणारे इनडोअर क्रीडा प्रकार म्हणजेच बॅडमिंटन, लॉन टेनिस, टेबल टेनिस इत्यादी क्रीडा प्रकारांना परवानगी दिली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व खबरदारी घेऊनच सर्व खेळ खेळण्यात यावे, असे आदेशात नमूद केले आहे. खेळाच्या ठिकाणी गर्दी टाळण्यात यावी आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे असे आदेशात म्हटले आहे. तसेच आवश्यक तेवढ्याच मर्यादित खेळाडूंनाच प्रवेश देण्यात यावा आणि सर्वांनी मास्कचा वापर करावा. खेळाच्या ठिकाणी थर्मल स्क्रीनिंग, सॅनिटायझर वापरावे, खेळाचे हॉल साहित्य यांचे वेळवेळी निर्जंतुकिकरण करावे, यासह हॉलमध्ये दारे, खिडक्या उघडी ठेवावीत आणि एसीचा वापर टाळावा, सर्व कर्मचाऱ्यांची कोविड -19 ची तपासणी करण्यात यावी, कर्मचाऱ्यांना मास्क, ग्लोव्हज, फेसशिल्ड अशी सुरक्षा साधने उपलब्ध करण्याचे या आदेशात स्पष्ट केले आहे.