जुन्नर (पुणे) - पुणे ग्रामीण पोलीस दलात कोरोनाचा शिरकाव झाला असून जुन्नर तालुक्यातील ओतूर पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे पुणे ग्रामीण पोलीस दलात खळबळ पसरली आहे. कोरोनाबाधित पोलीस आधिकाऱ्याच्या संपर्कात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे तातडीने स्वॅब घेण्यात येणार असल्याची माहिती, सहायक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी दिली आहे.
ओतूर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असणारा पोलीस आधिकारी माळशेज घाट, नगर-कल्याण महामार्ग, पोलीस स्टेशन परिसरात काम करत होता. त्यावेळी त्यांच्या संपर्कात अनेक पोलीस कर्मचारी, नागरिक आले असल्याने कोरोनाचा समूह संसर्ग होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पोलीस आधिकाऱ्याच्या संपर्कातील कर्मचारी व नागरिकांचे तातडीने स्वॅब घेण्याचे काम सुरू आहे.
खेड-आंबेगाव, जुन्नर तालुक्यात पुणे, मुंबई परिसरातून अनेक नागरिक तळेगाव व माळशेज मार्गाने येत आहेत. यामुळे या मार्गावर पोलिसांचे चेक पॉइंट लावण्यात आले आहेत. त्यामुळे मुंबई पुणे परिसरातून येणाऱ्या नागरिकांमुळे पोलीस दलात कोरोनाची लागण होण्याची भीती आहे.