पिंपरी-चिंचवड (पुणे) - महानगरपालिकेचे नवनिर्वाचित विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी 'पीपीई' किट घालून थेट पिंपरीमधील कोविड केंद्रामध्ये 'एन्ट्री' करत कोरोनाबाधित रुग्णांची विचारपूस केली. त्यावेळी अनेक रुग्णांनी त्यांच्याकडे तक्रारींचा पाढा वाचला. तसेच कमी जेवण द्या, पण चांगल्या दर्जाचे जेवण मिळावे, अशी मागणी राजू मिसाळ यांच्याकडे केली. दरम्यान, या अगोदर कोविड केंद्रामध्ये जाण्याचे धाडस स्थानिक राजकीय नेत्यांनी किंवा नगरसेवकांनी केले नव्हते.
राजू मिसाळ महानगरपालिकेच्या कक्षात धार्मिक पूजा-अर्चा करत खुर्चीवर विराजमान झाल्यानंतर शहरात चर्चा रंगली. त्यानंतर आज म्हणजे दुसऱ्याच दिवशी पीपीई किट परिधान करून चक्क ऑटो क्लस्टर येथील कोविड केंद्रात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ऑटो क्लस्टर येथे एकूण 218 खाटांचे कोविड केंद्र महानगरपालिकेने उभारले आहे. यात अत्याधुनिक आयसीयू बेड देखील उपलब्ध असून हे केंद्र पूर्ण क्षमतेने सुरू झालेले नाही.
हेही वाचा - पिंपरी-चिंचवडमध्ये अनैतिक संबंधाच्या संशयावरून एकाचा खून; चार आरोपींना बेड्या
विरोधी पक्षनेते राजू मिसाळ म्हणाले की, केंद्रातील रुग्णांनी जेवणाविषयी तक्रारी माझ्याकडे केल्या आहेत. केंद्राच्या बाहेरील वैद्यकीय कचरा गेल्या चार दिवसांपासून उचललेला नाही. सत्ताधारी या भागाला भेट देऊन जातात त्यांना हा कचरा दिसत नाही का? यामुळे कोरोना वाढला तर त्याला जबाबदार कोण? कोविड केंद्रात सिटीस्कॅन मशीन नाही. ती उपलब्ध करणे सत्ताधाऱ्यांचे काम आहे. कोविड सेंटर पूर्ण क्षमतेने सुरू झालेले नाही. टप्प्या-टप्प्याने सुरू करत आहेत. आयसीयूमध्ये साधे बेड आहेत, तिथे अत्याधुनिक बेड हवे आहेत. ते व्यवस्थित केले पाहिजेत. याविषयी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याशी बोलणार आहे.