पुणे : महाराष्ट्रात पहिली महिला मुख्यमंत्री विराजमान करण्याचे संकेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. यावर विरोधी पक्षनेते अजित पवार ( Opposition leader Ajit Pawar ) यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, 145 आकडा जो मिळवू शकतो तो मुख्यमंत्री होऊ शकतो. उद्या कोणाच्या मनात काय यावं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. उद्धव ठाकरे यांच्या मनात तसे आले असेल म्हणून त्यांनी तसे विधान केले असेल. उद्या महिला किंवा पुरुष कोणालाही मुख्यमंत्री करायचे असेल तर 145 आकडा जो मिळू शकतो तो मुख्यमंत्री होऊ शकतो, असे पवार म्हणाले.
हरिश साळवींकडे केस देण्याची मागणी - महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात सुरू असलेल्या वादावर प्रतिक्रिया देताना विरोधी पक्ष नेते अजित पवार म्हणाले की, सध्या या दोन राज्यात सुरू असलेल्या प्रश्नावर न्यायालयीन लढाई लढण्यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्म्ई यांनी प्रख्यात विधीज्ञ रोहटगी यांच्याकडे सदर केस दिली आहे. महाराष्ट्र राज्याच्या वतीने आपली बाजू मांडण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रख्यात विधीज्ञ हरीश साळवी यांच्याकडे केस द्यावी असे सांगितले. पूर्वी आघाडी सरकारच्या काळात या केसेस चालायच्या त्यावेळी विलासराव देशमुख यांनी साळवी यांच्याकडेच जबाबदारी दिली होती. सुदैवाने साळवी हे नागपूरचे सुपुत्र असून त्यांना या प्रश्नांची चांगली जाण आहे, असेही पवार म्हणाले..
राज्यपालांवर कारवाईची मागणी - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी राज्यपाल यांनी केलेल्या आक्षेपार्य वक्तव्याचा सर्व स्तरातून तीव्र शब्दात निषेध केला आहे. अशा प्रकारची वक्तव्य अनेकांकडून येत आहेत, मात्र त्याकडे राज्यकर्त्यांचे लक्ष नाही. तेवढ्यापुरते काहीतरी बोलून वेळ मारून नेत आहेत. वास्तविक यासंदर्भात महाराष्ट्रातील तमाम जनतेची भावना अतिशय तीव्र आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे दैवत आहेत. त्यांच्याबद्दल उठ सूट आक्षेपार्य वक्तव्य केलेले महाराष्ट्रातील जनता कदापी खपून घेणार नाही. अशी वक्तव्य जे कोणी करत आहेत. त्या व्यक्तींना ज्यांनी कोणी नेमले आहेत, त्यांनी ताबडतोब यात लक्ष घालून योग्य ती कारवाई केली पाहिजे, असेही पवार म्हणाले. मंत्रिमंडळ विस्तारावर बोलताना पवार म्हणाले की, जे मुख्यमंत्री असतात. त्यांच्यासह 43 मंत्री आणि राज्यमंत्री करता येते. आत्ता ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह 20 जण काम करत आहेत. त्यामुळे अजून त्यांना 23 लोकांना संधी देता येईल असेही पवार म्हणाले.