आळंदी (पुणे) - राज्य सरकारने दारूची दुकाने उघडली. मात्र, मंदिरे बंद ठेवल्याने भाजपासह धार्मिक संघटनांना एकत्र करून आज (मंगळवारी) संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरापुढे आंदोलन करण्यात आले. यावेळी संजीवन समाधी मंदिरासमोर 'उद्धवा धुंद तुझा दरबार', 'ताटी उघडा ज्ञानेश्वरा' म्हणत वारकरी व भाजपाने राज्य सरकारचा निषेध केला.
कोरोना महामारीचा समुह संसर्ग रोखण्यासाठी मागील सहा महिन्यांपासून सार्वजनिक, धार्मिक कार्यक्रमांना बंदी होती. त्यानंतर मिशन बिगिन अंतर्गत राज्य सरकारने हळूहळू काही बाबींना सुट दिली. मात्र, मंदिरे अद्यापही बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे वारकरी संप्रदायाचे दैवत असणाऱ्या संत ज्ञानेश्वर माउलींचे दर्शन घेता येत नसल्याने वारकऱ्यांमध्ये नाराजीचा सुर पहायला मिळत आहे.
राज्यात दारुची दुकाने, हॉटेल्स सुरू होत आहेत. मात्र, मंदिरे बंद ठेवली जातात. राज्य सरकारची ही दुटप्पी भुमिका आहे. त्यामुळे वारकरी समाज्याच्या भावना लक्षात घेऊन सरकारने तत्काळ संत ज्ञानेश्वर माउलींचे मंदिर दर्शनासाठी खुले करण्याची मागणी भाजपाच्या वतीने यावेळी करण्यात आली. आळंदीत आज (मंगळवारी) भाजपाच्यावतीने संजीवन संमाधी मंदिरासमोर टाळ, मृदगांच्या नादात हरिनामाचा गजर करत ही मागणी करण्यात आली.
अनलॉक 5 महाराष्ट्र -
मिशन बिगीन अगेन अंतर्गत 5 ऑक्टोबरपासून बार, हॉटेल, रेस्टॉरंट 50 टक्के उपस्थितीत सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. तसेच डबेवाल्यांनाही ट्रेनमध्ये प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. त्यासाठी क्यूआर कोड काढून डबेवाल्यांना प्रवास करावा लागणार आहे. कोरोनामुळे मार्च महिन्यापासून देशासह राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. तेव्हापासून राज्यातील हॉटेल, बार बंद आहेत. सध्या अनलॉकची प्रकिया सुरू असून, त्यानुसार आता 5 ऑक्टोबरपासून बार, हॉटेल, रेस्टॉरंट 50 टक्के उपस्थितीत सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे.
राज्यात अनलॉक ५ संदर्भात मार्गदर्शक जाहीर झालेल्या सूचना -
- हॉटेल, बार, रेस्टॉरंट ५ ऑक्टोबरपासून सुरू होणार
- ५० % क्षमतेने हॉटेल, बार, रेस्टॉरंट सुरू करण्यास परवानगी
- डबेवाल्यांना लोकल ट्रेनमधून प्रवास करण्यास परवानगी
- अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकलच्या फेऱ्या वाढवणार
- डबेवाल्यांसाठी क्यूआर कोड देण्यात येणार
- राज्यात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी रेल्वे सुरू करण्यास परवानगी
- शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस ३१ ऑक्टोबरपर्यंत बंदच राहणार
- मेट्रो सेवासुद्धा ३१ ऑक्टोबरपर्यंत बंदच राहणार
- सिनेमागृह, स्विमिंगपूल, इंटरटेन्मेंट पार्क, थिएटर बंद राहणार
- नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी तसेच प्रवास करताना चेहऱ्यावर मास्क लावणे बंधणकारक आहे.
या अनलॉक 5मध्येही मंदिर उघडण्यास परवानगी दिल्यामुळे भाजपाने राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे