बारामती (पुणे) - सोमवारपासून शाळा सुरू करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. मात्र, याबाबत गोंधळाची परिस्थिती अद्यापही कायम आहे. शिक्षकांच्या आरटीपीसीआर चाचण्या पूर्ण झाल्याशिवाय शाळा सुरू करता येणार नाहीत. मात्र, बारामती शहर व तालुक्यात केवळ १० टक्के शिक्षकांच्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे सोमवारी शाळेचे दार उघडण्याची शक्यता कमी आहे.
बारामती शहर व तालुक्यात ९वीपासून पुढे १२वीपर्यंत शिक्षण देणाऱ्या एकूण ६० शाळा आहेत. या शाळांमधून सुमारे २९ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. तर १ हजार २८४ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. यापैकी आतापर्यंत केवळ १२६ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आरटीपीसीआर चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. यामध्ये एकही शिक्षक व कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आलेला नाही. उर्वरित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना २७ नोव्हेंबरपर्यंत चाचण्या पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
स्थानिक प्रशासनाची असणार जबाबदारी
स्थानिक प्रशासनाचे सहकार्य व नियोजनानुसार दररोज चार तास शाळा सुरू राहणार आहे. असे असले तरी शाळेमध्ये आपले पाल्य पाठवायचा का नाही हे संपूर्ण ऐच्छिक जबाबदारी असणार आहे. शाळेमध्ये कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम तसेच क्रीडा उपक्रम राबविण्यात येणार नाही. असे बारामतीच्या शिक्षण विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे. शाळा प्रशासन तसेच ग्रामपंचायती, स्थानिक पदाधिकारी यांच्या तयारी व नियोजनावरच शाळेचे दार उघडणार की बंद राहणार हे ठरणार आहे. शिक्षण विभागाने दिलेल्या मार्गदर्शन सूचनेप्रमाणे शाळांमध्ये आवश्यक सुविधा, सॅनिटायझर आदींची जबाबदारी स्थानिक प्रशासनाची आहे. असले तरी पालक शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये समारंभ कायम आहे.