पुणे - महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी (आझम कॅम्पस) येथे आज (दि. 21 जून) सकाळी 7 वाजता 'आंतरराष्ट्रीय योग दिवस' ऑनलाइन प्रात्यक्षिकाद्वारे साजरा करण्यात आला. एम. सी. ई. सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार यांनी ही माहिती पत्रकाद्वारे दिली.
यावेळी क्रीडा मार्गदर्शक शबनम पीरजादे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी घरातूनच ऑनलाइन योग प्रात्यक्षिके सादर केली. त्याचा सराव अनेक दिवस सुरु होता. संस्थेच्या सर्व 31 शैक्षणिक आस्थापनांमध्ये त्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. सहभागी विद्यार्थ्यांनी आपापल्या योग सहभागाचे व्हिडीओ संस्थेकडे पाठवायचे आवाहन करण्यात आले .एकूण 16 योग प्रकार या उपक्रमात सादर करण्यात आले, अशी माहिती आझम स्पोर्ट्स अकादमीचे संचालक गुलझार शेख यांनी दिली.
योगाभ्यास हा आपल्याला शारीरिक आणि मानसिक संतुलन राखण्यासाठी मदत करतो. अध्यात्म आणि विज्ञान यांचा संतुलित संगम म्हणजेच योग. भारताने अवघ्या विश्वाला दिलेल्या अनेक देणग्यांपैकी एक म्हणजे योग! योग आणि योगाभ्यासाबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावर जनजागृती करण्यासाठी 21 जून हा दिवस 'आंतरराष्ट्रीय योग दिन' म्हणून साजरा करण्यात येतो.
27 सप्टेंबर, 2014मध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना मांडली. यावेळी त्यांनी सांगितले, की योग हा केवळ एक व्यायामप्रकार नसून, आपल्या 'स्व'चा शोध घेण्याचा, मनः शांती प्राप्त करण्याचा आणि मानसिक व शारीरिक संतुलन राखण्याचा एक मार्ग आहे. त्यानंतर दरवर्षी 21 जूनला 'जागतिक योग दिन' साजरा करण्यात येतो.
दरम्यान, आज सहाव्या योग दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले. यावेळी ते म्हणाले, की जर रोग प्रतिकारशक्ती चांगली असेल तर आपण कुठल्याही रोगाशी लढू शकतो. मात्र, रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी योगा करणे गरजेच आहे. योगामधील वेगवेगळ्या आसनांमधून आपण रोग प्रतिकारक शक्ती वाढवू शकतो. कोरोना मानवी शरीराच्या श्वसनसंस्थेवर परिणाम करते. त्यामुळे प्राणायाम किंवा श्वासाचे व्यायाम करणे गरजेचे आहे. प्रामाणिपणे काम करणे हा सुद्धा एक प्रकारचा योग असल्याचे मोदींनी सांगितले.
हेही वाचा - वाकडमध्ये महिलांचा विनयभंग करणारा विकृत जेरबंद