पुणे - गेले काही दिवस वातावरण ढगाळ असल्याने कांदा पिकावर मावा, बुरशी, करपा आदी रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने दौंड तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. कसेबसे हाताशी आलेले पीक वाचवण्यासाठी ते विविध प्रकारची महागडी औषधे फवारणी करून घेत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे.
कांद्याचे होत आहे नुकसान
मागील काही महिन्यांत कांद्याचे भाव वाढल्याने शेतकऱ्यांना कांदा पिकातून चांगला आर्थिक फायदा झाला होता. यानंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर शेतकऱ्यांनी कांद्याचे महाग बी, रोपे विकत घेऊन आपल्या शेतात लावले. पण, निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले असल्याची परीस्थिती निर्माण झाली. कांदा पिक पिवळे पडत आहे. कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणवर नुकसान होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
ढगाळ वातावरणामुळे रोग
ढगाळ वातावरणामुळे कांद्यावर रोग पडत असल्याने वारंवार औषध फवारणी करावी लागत आहे. यामुळे औषध विक्रेते जोमात आणि शेतकरी मात्र कोमात, अशी अवस्था झाली असून, शेतकऱ्यांच्या खर्चात मोठी वाढ झालेली आहे. शेतकरी अधिक अडचणीत येताना दिसत आहे.
हेही वाचा - हातभट्टीची दारू विक्री प्रकरणी एकावर गुन्हा दाखल
कांदा पीक हातात कसे येईल, यासाठी प्रयत्न
यंदा मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा आहे. परंतु, ढगाळ वातावरणाचा फटका कांद्याला बसत आहे. यंदा कांद्याला चांगला भाव मिळाल्याने शेतकरी कांदा पीक कसे हातात येईल, यावर भर देत आहेत. ते मोठ्या प्रमाणावर महागड्या औषधांची फवारणी करीत आहेत.
कांदा शेतकऱ्यांना तारेल का ?
कांदा लागवड करण्यासाठी एकरी ३० ते ३५ हजार खर्च झालेला आहे. झालेला खर्च आणि निर्सगाच्या तावडीतून सुटलेला कांदा पीक शेतकरी बांधवांना तारेल का? याची काळजी शेतकरी बांधवाना लागलेली आहे. गेल्या ८-१० दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे कांद्यावर मावा पडत आहे. कांद्याची पात वाकडी होत आहे. करप्यामुळे कांद्याची पात पिवळी पडत आहे. आठवड्यात १-२ वेळा औषध फवारणी करावी लागत आहे. रोगामुळे कांद्याचे उत्पादन कमी होणार आहे. यामुळे खर्च जास्त आणि उत्तन्न कमी होईल, अशी माहिती पाटस येथील शेतकरी संजय शिंदे यांनी दिली.
हेही वाचा - भिमाशंकर रोडवर ट्रॅक्टरचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, एक जण जखमी