पुणे - दाजीचे दुसऱ्या महिलेशी प्रेम संबंध असल्यामुळे बहिणीशी नेहमी भांडण करणाऱ्या दाजीचा मेहुण्याने खून केल्याची धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवडमध्ये रविवारी (दि.9 फेब्रुवारी) रात्री घडली आहे.
मोहन लेवडे (वय 45 वर्षे), असे खून करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून विष्णू झगडे (वय 29 वर्षे), असे आरोपी मेहुण्याचे नाव आहे. खून केल्यानंतर आरोपीने पिंपरी-चिंचवड पोलिसांना शंभर नंबरवर फोन करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर भोसरी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बहिणीचे आणि भावोजीचे पटत नव्हते. कारण शोधले असता, मोहन यांचे मागील तीन वर्षांपासून शेजरीच राहणाऱ्या महिलेसोबत प्रेमसंबंध होते. यामुळे भावोजी बहिणीला घटस्फोट देण्यासाठी त्रास देत होते. मुलांना घेऊन तू माहेरी जा, असे म्हणत छळत होता. हे सर्व बहिणीने आपल्या भावाला म्हणजेच आरोपी विष्णू झगडेला सांगितले. दि. 3 फेब्रुवारीला तो पिंपरी-चिंचवड शहरात बहिणीकडे आला होता. दाजी-मेहुणे यांच्यात गप्पा रंगल्या त्यानंतर रविवार पर्यंत विष्णुने मोहनला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोहन समजून घेत नव्हता.
हेही वाचा - हिंगणघाटमधील पीडितेचा मृत्यू; सुप्रिया सुळे, अजित पवार यांची संतप्त प्रतिक्रिया
त्यानंतर रविवारी (दि. 9 फेब्रुवारी) रात्री उशिरा घरच्या गच्चीवर दोघांनी दारू पिली. दोघेही नशेत होते. तेव्हा देखील विष्णूने मोहनला पून्हा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्यात भांडण झाले. त्यात विष्णूने मोहनवर धारदार शस्त्राने सपासप वार केले. आरडा ओरडा ऐकून खाली घरात झोपलेली बहीण धावत वर आली. विष्णूने बहिणीला त्याने घटलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर आज पहाटेच्या सुमारास विष्णुने शंभर नंबरवर फोन करून आपण दाजीचा खून केल्याची माहिती दिली. त्यानंतर भोसरी पोलीस घटनास्थळी येऊन आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
हेही वाचा - डॉक्टर पतीच्या जाचाला कंटाळून संगणक अभियंता पत्नीची आत्महत्या