पुणे- पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यांतर्गत अनैतिक संबंधाच्या संशयावरून एकाचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
भागूजी बाळू केदारी (28, रा. ठाकर वस्ती, मावळ) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी सुरेखा भागूजी केदारी (25) यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. पोलिसांनी मुख्य आरोपी लक्ष्मण उर्फ खन्ना दादू केदारी (25), दादू भिवा केदारी (45), अरुण दादू केदारी (22) या आरोपींना अटक केली आहे. सर्व आरोपी इंदोरी, ठाकर वस्ती ता. मावळ, जि. पुणे येथील रहिवासी आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील मावळ तालुक्यात अनैतिक संबंधाच्या संशयावरून खून करण्यात आला आहे. आरोपी लक्ष्मणने पत्नीची समजूत काढून तिला माहेरी पाठविले होते. याची माहिती मृत आणि त्याचा मित्र सुनील केवाळे यांना लागली. त्यांनी मध्यरात्री आरोपी लक्ष्मणला जाऊन जाब विचाला. तेव्हा, त्यांच्यात भांडण झाले. यावेळी आरोपी लक्ष्मण याने भागूजी याच्या पोटात चाकू भोकसून खून केला आहे. या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप लोंढे यांनी दिली आहे.