पुणे- पिंपरी-चिंचवडमध्ये ५ वर्षीय चिमुकलीला चॉकलेटचे आमिश दाखवून ६७ वर्षीय नागरिकाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात पीडित चिमुकलीच्या ५३ वर्षीय आजीने तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाऊराव उर्फ आप्पा बळीराम खरात (वय.६७) असे लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.
भाऊराव याला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी अडीचच्या सुमारास नेहरूनगर परिसरात ही घटना घडली. आरोपीने चौथ्या मजल्यावर असलेल्या घरात ५ वर्षीय चिमुकलीला चॉकलेटचे आमिश दाखवून बोलवून घेतले आणि तिच्याबरोबर लैंगिक चाळे केले. यावेळी आरोपीच्या घरात कोणी नव्हते, अशी माहिती पिंपरी पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, ५ वर्षीय चिमुकलीने काही तासांनी ही घटना आपल्या आजीपाशी बोलून दाखवली. त्यामुळे ही गंभीर घटना उघडकीस आली आहे. या घटनेप्रकरणी आरोपी भाऊरावला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक उत्कर्षा देशमुख करत आहे.
हेही वाचा- 'रागाने का बघतोस', असे म्हणून टोळक्याने केली वाहनांची तोडफोड