पुणे - कोरोनाच्या या भयाण संकटाने अनेकांची दैना झाली आहे. छोटी-मोठी काम करून उदरनिर्वाह भागवणाऱ्यांचाही रोजगार बुडाला आहे. पिंपरी-चिंचवडमधल्या एका आजीबाईंची अशीच कहाणी आहे. उदरनिर्वाह भागवण्यासाठी आजीबाई लहान मुलांची मालिश करण्याचे काम करतात. मात्र, कोरोनामुळे त्यांचे काम बंद झाले आहे.
हेही वाचा- शाब्बास..! लॉकडाऊनमध्ये बाप-लेकाने खोदली विहीर, पाणी प्रश्न कायमचा मिटवला
आईच्या उतार वयात मुलांनी तिचा आधार बनायचे असते. मात्र, आईलाच मुलाला आधार देण्याची वेळ आली आहे. मुलाच्या आजारपणात जवळच्या सर्व नातेवाइकांनी साथ सोडली. मात्र, रुक्मिणी (वय 65) या आजी बिकट परिस्थितीतही मुलाचा सांभाळ करीत आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात राहणाऱ्या रुक्मिणी करोते या ४२ वर्षीय मुलाचा सांभाळ करत आहेत. मुलगा उमेश हा किरकोळ आजाराने त्रस्त होता. मात्र, त्यानंतर पायाला जखम झाली आणि गॅगरींग झाल्याने गुडघ्यापासून पाय वेगळा करावा लागला.
अशा कठीण प्रसंगात उमेशच्या सोबतीला केवळ आई रुक्मिणी याच आहेत. गेल्या तीन वर्षापासून रुक्मीनी उमेश यांचा सांभाळ करतात. लहान मुलांचे मालिश करुन रुक्मीनी उदरनिर्वाह भागवतात. मात्र, कोरोनाचे संकट आल्याने त्यांचे काम बंद पडले आहे. रुक्मिणी यांना नातेवाईक, मुलगा आणि मुलगी आहे. पण या कठीण काळात कोणीच मदत करीत नसल्याचे रुक्मीनी सांगतात.