दौंड - तालुक्यातील पाटस या गावात कोरोना या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर ईटीव्ही भारतच्या वतीने रियालिटी चेक करण्यात आला. यावेळी पाटस गावात उभारण्यात आलेले कोविड सेंटर, कोरोना तपासणीसाठी रॅपिड अँटिजेन टेस्टची वाढविण्यात आलेली संख्या, पाटस प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे पाटस गावात कोरोना बधितांची संख्या कमी होत असल्याचे दिसत आहे. मागील महिन्यात पाटस गावात सुमारे ११७ कोरोना पॉझिटिव्ह पेशंट होते. मात्र, आता कोरोनाबधितांची संख्या कमी झाली असून पाटस गावातील ५८ जण कोरोनाबाधित असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.
गावातील रस्ते बंद -
दौंड तालुक्यातील पाटस गावात कोरोना या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने गावातील मुख्य रस्ते बंद करण्यात आले आहेत. गावात भाजीपाला विक्री आणि किराणा दुकानदार यांच्यासाठी ७ ते ११ अशी वेळ ठरवून दिली आहे. आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासन यांच्या वतीने योग्य त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची कोरोना तपासणी पोलिस आणि आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आली होती.
लसीकरणाची समस्या -
पाटस गावात लसीकरणाची परिस्थिती सध्या फारशी चांगली नसल्याचे दिसून येत आहे. गावातील लसीकरण केंद्रावर लस उपलब्ध झाली तरच लसीकरण करण्यात येते. आता फक्त ४५ वर्षावरील नागरिकांना लसीचा दुसरा डोस देण्यात येत आहे. लस कमी येत असल्याने लसीकरण करण्यात अडथळे येत असल्याचे चित्र दिसत आहे. अनेक नागरिक याबद्दल रोष व्यक्त करत आहेत.
गावातील रुग्णांची नेमकी संख्या -
पाटस गावात एप्रिल महिन्यात कोरोना बधितांची संख्या वाढली होती. गावातील पॉझिटिव्ह रुग्ण संख्या ११७ इतकी झाली होती. पाटस गावात लोक सहभागातून तयार करण्यात आलेल्या १०० बेडच्या कोविड केअर सेंटरचा फायदा गावातील कोरोना बधितांना होत आहे. येथे कोविड तपासणीसाठी रॅपिड अँटिजेन टेस्ट किटचा वापर केला जात आहे. याचा फायदा गावातील कोरोनाची लक्षणे असणाऱ्या नागरिकांना होत आहे. कोरोना तपासणीची सुविधा गावात उपलब्ध झाली असल्याने गावातील नागरिक कोविड सेंटरला जाऊन कोरोना तपासणी करून घेत आहेत.
यामुळे कोरोना तपासणी न केलेले, किरकोळ स्वरूपाचे लक्षणे असतील असे लोक गावातील कोविड सेंटरला जाऊन कोरोना तपासणी करून घेत आहेत. यामुळे कोरोना बाधित लोकांना लगेच कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करून घेतले जात आहे. यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यात मदत होत आहे, अशी माहिती आरोग्य सेवक भिमराव बडे यांनी दिली.