पुणे - कोरोनाच्या संकटामुळे यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय गणेश मंडळांनी घेतला आहे. पुण्यातील अनेक गणेशोत्सव मंडळांनी अभिनव निर्णय घेतले आहेत. त्यामध्ये यंदा नेहमीच्या दानपेटीसोबतच डिजिटल दानपेटी बाप्पासमोर ठेवण्यात आली आहे. पुण्यातील मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी आणि मानाचा चौथा तुळशीबाग गणपती या मंडळासमोर डिजिटल दानपेटी ठेवण्यात आली आहे. यामध्ये गणेशभक्त पेटीएम, फोन पे या माध्यमातून बाप्पा चरणी दान करू शकतात.
मानाचा दुसरा गणपती असलेल्या तांबडी जोगेश्वरी गणपतीसमोर ठेवण्यात आलेल्या डिजिटल दानपेटीविषयी माहिती देताना मंडळाचे विश्वस्त मधूमिलिंद मेहंदळे म्हणाले, यंदा कोरोनामुळे सोशल डिस्टन्स पाळण्याचे लोकांना आवाहन केले जात आहे. तसेच कोणत्याही वस्तूंना हात न लावण्याचे आवाहनही करण्यात येत आहे. त्यामुळे यंदा आम्ही फोन-पे, पेटीएम या माध्यमातून दान स्वीकारत आहोत. याला भाविकांचा प्रतिसादही चांगला मिळत असून भाविक भरभरून दान करत आहेत.
या दानपेटीत फोन-पे च्या माध्यमातून दान करताना तेजस तुपे म्हणाला, अशाप्रकारे दान करता येऊ शकेल, असा विचारही केला नव्हता. हे खूप सोयीस्कर आहे. अनेकदा सुट्ट्या पैशाअभावी इच्छा असतानाही दान करता येत नाही. परंतु, फोन पे च्या माध्यमातून कधीही केव्हाही दान करता येते. यामुळे दानपेटीला हात लागत नसल्यामुळे कोरोनाची भीतीही राहत नाही.