पुणे - पिंपरी-चिंचवडमधील भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकावर कोयत्याने वार झाले. मात्र, पोलिसांमुळे त्याचे प्राण वाचले आहेत. संजय शेखापुरे असे जखमी तरुणाचे नाव असून तो गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे. जखमी शेखापुरे हा मंगेश मोरे टोळीचा सदस्य असून त्यांच्या टोळीने मयूर मडकेचा खून केला होता. त्याचा बदला घेण्यासाठी शेखापुरे याच्यावर खुनी हल्ला करण्यात आला. मात्र, भोसरी पोलीस योग्य वेळी घटनास्थळी पोहोचल्याने वार करत असताना आरोपींनी पोबारा केला. या प्रकरणी भोसरी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे.
सायंकाळच्या सुमारास आळंदी-दिघी रस्त्यावर अज्ञात व्यक्ती दुचाकी वरून शेखापुरेला शोध असल्याची माहिती खबऱ्याने पोलीस उपनिरीक्षक महेंद्र गाढवे यांना दिली. माहिती मिळताच वरीष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी पथक रवाने झाले. घटनास्थळी संजय शेखापुरे याच्यावर कोयत्याने वार होत असल्याचे त्यांनी पाहिले.
पोलीस आल्याचं पाहताच आरोपींनी पळ काढला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून दोघांना पकडले. गंभीर जखमी असलेल्या तरुणावर खासगी रुग्णलयात उपचार सुरू आहेत. जखमी व्यक्ती मंगेश मोरे टोळीचा सदस्य असून त्याच्या टोळीतील सदस्यांनी मयूर मडकेचा काही महिन्यांपूर्वी खून केला होता. त्यामुळे शेखापुरे याच्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला. यात तो गंभीर जखमी झाला आहे.
संबंधित कारवाई वरीष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेंद्र गाढवे, सागर भोसले, विधाते, अजित ढगळे, सागर जाधव, किरण जाधव, पोलीस नाईक पेटकर यांच्या पथकाने केली.