पुणे - पावसाळा असल्याने अनेक हौशी पर्यटक गडकिल्यांना भेटी देत असतात. यानिमित्त मावळ परिसरातील लोहगड, विसापूर, तुंग, तिकोणा या गडकिल्यांना पर्यटक भेटी देत आहेत. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या गडकिल्यांना पावसाळ्यात भेटी देणे अनेकांसाठी पर्वणी असते. मात्र गेल्या काही दिवसांपासून गडकिल्यांवर अनुचित घटना वाढल्या असून मद्यपान, प्रेमी युगुलांचे अश्लील चाळे, धूम्रपानामुळे गडकिल्यांवरील ऐतिहासिक पावित्र्य बाधित होत असून बजरंग दलाने या विरोधात ठोक मोहीम राबविण्याचा पवित्रा घेतला आहे.
गेल्या काही दिवसांपासून गडकिल्ल्यांवर घडणाऱ्या अनुचित घटना रोखण्यासाठी बजरंग दलाने ठोक मोहीमेचा पवित्रा घेतल्यानंतर पोलिसांनी येथील अनुचित प्रकार रोखण्यासाठी बंदोबस्त वाढवला आहे. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी पुढाकार घेऊन किल्ल्याच्या पायथ्याशी पोलिसांना तैनात केले आहे. यामुळे बजरंग दलाने मवाळ भूमिका घेतली आहे. मात्र, कोणताही अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास आम्ही शांत बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
लोहगड, विसापूर किल्ला, तुंग किल्ला, तिकोणा गडावर बजरंग दल आणि लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या वतीने सूचना फलक लावण्यात आले आहेत. तसेच, गडाच्या पायथ्याशी बजरंग दलाचे कार्यकर्ते पर्यटकांच्या सामानाची तपासणी करत असून गड किल्ल्यांवर कोणताही अनुचित प्रकार करु नये, यासाठी सूचनाही देत आहेत.