पुणे - ठाकरे सरकारने भाजपच्या प्रमुख नेत्यांची सुरक्षा हटवल्यानंतर आमचे संरक्षण पोलीस नव्हे, तर राज्यातील जनता करते, अशी खोचक टीका केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांनी ठाकरे सरकारवर केली आहे. सुरक्षा काढल्याने आमच्या कामात तसूभर ही फरक पडणार नाही, असेही त्यांनी म्हटले.
जनता आमची सुरक्षा करते -
सरकार ज्या भावनेने काम करत आहे, त्याचा उद्देश मला माहित नाही. केवळ देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील याचेच नव्हे, तर माझ्यासह अनेक प्रमुख नेत्यांची सुरक्षा कमी केली. पण याबाबत आम्ही सरकारकडे दाद मागणार नाही. कारण आमचे संरक्षण पोलीसच करते असे नाही, तर राज्यातील जनता आमची सुरक्षा करते. त्यामुळे सुरक्षेत कपात केल्याने आमच्या कामात तसूभर ही फरक पडणार नाही. तसेच यासाठी सरकारने नेमलेली एक समिती असते. ती समिती आढावा घेते. मग कोणाच्या जीवाला काही धोका आहे का, याचा अहवाल पोलीस देते, मगच सरंक्षण मिळते. त्यानंतर ही सुरक्षेत कपात केली. परंतु याला आमचा काहीही आक्षेप नाही, असेही ते म्हणाले.
अब्दुल सत्तार आमचे चांगले मित्र आहेत -
अब्दुल सत्तार माझे चांगले मित्र आहेत. ते बिचारे इतके बोलतात पण निवडणूक आली की, माझेच काम करतात. ते माझे चांगले मित्र आहेत. त्यांच्या तालुक्यात माझी आणि माझ्या तालुक्यात त्यांची सासुरवाडी आहे. पण मी त्यांची टोपी कधीच निघू देणार नाही, चिंता करू नका. खरे तर केसच उगवू देणार नव्हतो. पण आता त्यांनी टोपी घातली आहे, असा मिश्कील टोलाही त्यांनी अब्दुल सत्तार यांना लगावला.
हेही वाचा - चाईल्ड पॉर्न खरेदी-विक्री प्रकरणी दोघांना अटक; सीबीआयची कारवाई