पिंपरी-चिंचवड (पुणे) - गेल्या सात महिन्यापासून बंद असलेल्या जिमचा पिंपरी-चिंचवड शहरात अखेर श्री गणेशा झाला आहे. कोरोनामुळे केंद्र आणि राज्यसरकारने जिम बंद करण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या सात महिन्यांपासून पिंपरी-चिंचवड शहर व संपूर्ण महाराष्ट्रातील जिम बंद होत्या. मात्र, सर्व काही अनलॉक होत असताना राज्यसरकारने दसऱ्याच्या मुहूर्तावर अटी आणि शर्तीसह जिम सुरू करण्यास परवानगी दिली आहे. पण, जिम व्यवसायाला पूर्वपदावर येण्यासाठी किमान दोन महिने लागतील, अशी माहिती कृष्णा हेल्थ क्लब जिमचे चालक आणि ट्रेनर कृष्णा भंडलकर यांनी दिली आहे. त्यामुळे जिम चालकांना आणि जिम ट्रेनर आणखी काही दिवस आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार आहे.
- पहिल्या दिवशी जिममध्ये शुकशुकाट
पिंपरी-चिंचवड शहरातील जिममधील पहिल्या दिवसाचे चित्र काही वेगळे नव्हते. बहुतांश जिममध्ये जिम मेंम्बरचा शुकशुकाट पाहायला मिळाला. जिम ला पूर्वपदावर येण्यासाठी आणखी काही दिवस वाट पहावी लागणार आहे.
- दिवाळीनंतर लोक येतील जिममध्ये
दसऱ्याच्या मुहूर्त साधून जिम सुरू करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली असली तरी शहरातील जिम मेम्बर मात्र दिवाळीनंतर जिममध्ये येणार असल्याचे सांगत असल्याची माहिती कृष्णा भंडलकर यांनी दिली आहे. कदाचित जास्त दिवस ही लागू शकतात, असे त्यांचे म्हणणे आहे.
- अजूनही कोरोनाची भीती
एकीकडे सरकारने अटी आणि शर्तीसह जिम सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र दुसरीकडे कोरोनाची भीतीने जिम मेम्बर जिमला येण्यास धजावत नाहीत हे स्पष्ट चित्र आहे.
- जिम चालकांनी सुरक्षितता बाळगल्यास वाढतील ग्राहक
गेल्या 7 महिन्यांपासून जिम व्यवसाय बंद आहे. राज्यसरकारने जिम व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली असून त्याची घडी बसायला आणखी दोन महिने लागण्याची शक्यता आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. पण, जिम मेम्बर अद्याप भीतीच्या सावटाखाली आहेत. पण, जिम चालकांनी सुरक्षितता बाळगल्यास ग्राहक वाढतील, असा विश्वास भंडलकरांना आहे.
- सात महिने होत्या असंख्य अडचणी
जिम ट्रेनर मनजीतकौर भिंडर म्हणाल्या की, सात महिने जिम बंद होती, मेंबर सुरळीत होण्यासाठी अवधी लागणार आहे. त्यांच्या देखील मनात कोरोनाबद्दल भीती आहे. गेली सात महिने अत्यंत खडतर होते. कौटुंबिक अडचणी आल्या, इतर नोकरी शोधण्याचा प्रयत्न केला. पण, ते होऊ शकले नाही, असे त्यांनी सांगितले.
- नियम पाळत जिममध्ये सुरू आहे व्यायाम
जिम ग्राहक रिटा पिल्ले म्हणाल्या की, सात-आठ महिन्यांपासून घरी होते, घरीच नॉर्मल व्यायाम करत होते. जिममध्ये जस व्यायाम करू शकतो तस घरी व्यायाम होऊ शकत नव्हता. आता जिम सुरू झाली आहे. मास्क, फेस शिल्ड, सॅनिटायझर, हॅन्ड ग्लोव्हज् हे घेऊन जिममध्ये येत आहोत. सोशल डिस्टसिंग पाळून जिम करत आहोत.
हेही वाचा - दसरा मेळाव्यात मुख्यमंत्र्यांकडून केवळ पोकळ घोषणा - विनायक मेटे